‘निक्षय मित्र’ योजनेतून 125 क्षयरुग्णांना सहा महिन्यांचा पोषण आहार;पालकमंत्री नितेश राणे यांचा पुढाकार

शेअर करा

स्वातंत्र्यदिनी विशेष सोहळा; खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांचाही होणार गुणगौरव

सिंधुदुर्ग,दि.१३ ऑगस्ट

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ‘टीबी मुक्त भारत अभियान’ प्रभावीपणे राबविण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी संवेदनशील पुढाकार घेतला आहे. ‘निक्षय मित्र’ योजनेअंतर्गत त्यांनी जिल्ह्यातील 125 गरजू क्षयरुग्णांना दत्तक घेतले असून, पुढील सहा महिन्यांसाठी त्यांना सकस व पोषणयुक्त आहार उपलब्ध करून देण्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

क्षयरोगावरील औषधोपचारांसोबत रुग्णांना सकस आणि संतुलित आहार मिळणे उपचार प्रक्रियेत महत्त्वाचे ठरते. रुग्णांची प्रतिकारशक्ती टिकविण्यास तसेच उपचारांचा कालावधी नियमितपणे पूर्ण करण्यास पोषण आहाराची मदत होते. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री श्री. राणे यांनी स्व-पुढाकाराने 125 क्षयरुग्णांच्या पोषणाची जबाबदारी स्वीकारली आहे.

या उपक्रमाचा शुभारंभ व पोषण आहार वाटपाचा विशेष सोहळा शनिवार, 15 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9 वाजता जिल्हा पोलीस मैदान, ओरोस येथे आयोजित करण्यात आला आहे. 

खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांचा गुणगौरव

‘टीबी मुक्त भारत अभियाना’च्या प्रभावी अंमलबजावणीत शासकीय आरोग्य यंत्रणेसोबत जिल्ह्यातील खाजगी वैद्यकीय क्षेत्राचे योगदानही महत्त्वपूर्ण आहे. क्षयरुग्णांची निक्षय पोर्टलवर वेळेत नोंदणी करणे, योग्य उपचाराबाबत मार्गदर्शन करणे आणि शासकीय आरोग्य यंत्रणेला सहकार्य करणे, या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या निवडक खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांचा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते विशेष सन्मान व गुणगौरव करण्यात येणार आहे.

पालकमंत्री नितेश राणे यांच्या या दातृत्वामुळे 125 क्षयरुग्णांना सहा महिन्यांसाठी पोषणाची साथ मिळणार असून, सिंधुदुर्ग जिल्हा क्षयरोगमुक्त करण्याच्या प्रयत्नांना या उपक्रमामुळे निश्चितच बळ मिळणार आहे.

जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, वैद्यकीय व्यावसायिक, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी क्षयरोग निर्मूलनाच्या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी केले आहे.

शेअर करा