लाल दगडाच्या उत्खननामुळे नैसर्गिक झरे व पाण्याचे स्रोत दूषित होत असल्याचा आरोप
सतत आंदोलन उपोषण करूनही प्रशासन करत आहे दुर्लक्ष: ग्रामस्थ
आचरा ,दि.२८ ऑगस्ट (अर्जुन बापर्डेकर)
कुडोपी गाव व परिसरातील लाल दगडाच्या उत्खननामुळे तसेच खाणीवरील कामगार उघड्यावर शौचास जात असल्यामुळे नैसर्गिक जलस्रोत बाधित होऊन पाणी दूषित होत असल्याने आरोग्यास धोका निर्माण झाल्याचा आरोप कुडोपी ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे. या प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून लहान मुले, वयस्कर माणसांसह ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात येत आहे .प्रशासनाकडे सातत्याने निवेदन, प्रसंगी उपोषण करूनही दुर्लक्ष करत असल्यामुळे येत्या चार दिवसात प्रकरणाची तातडीने चौकशी करून निर्णय न घेतल्यास उग्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
याबाबत माहिती देताना ग्रामस्थ म्हणाले की कुडोपी गाव व परिसरामध्ये लाल दगडाचे उत्खनन सुरू असून उत्खननामुळे परिसरातील नैसर्गिक झरे, विहिरी तसेच पाण्याचे इतर नैसर्गिक स्रोत बाधित होत असून पर्यावरणाचेही मोठे नुकसान होत आहे. कुडोपी गावाला मागील अनेक वर्षांपासून पाणीपुरवठा करणारे नैसर्गिक झरे व परिसरातील जलस्रोत हे ग्रामस्थांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. मात्र उत्खननामुळे या नैसर्गिक झऱ्यांचे पाणी दूषित होत असून त्याचा थेट परिणाम ग्रामस्थांच्या आरोग्यावर होऊ लागला असल्याचे ग्रामस्थ म्हणाले. यावेळी यावेळी प्रशांत पडवळ, गुरुप्रसाद मयेकर, हेमंत पडवळ, राजेंद्र हिर्लेकर, बाळकृष्ण पडवळ विजय वाळवे, दिनानाथ पडवळ, दत्ताराम वाळवे, गणेश वाळवे, शशिकांत वाळवे, नंदकुमार पडवळ, सचिन पडवळ, राजाराम पाटणकर, प्रवीण मुणगेकर, गणपत घाडी, गौरव अपराज, मोहन वाळवे, दिनेश वाळवे, दशरथ वाळवे, अनिल वरक, श्लोक घाडी, संतोष वाळवे, दिपक शेळके, अनिल हिर्लेकर, समीर हिर्लेकर, शंकर हिर्लेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
खाणीतील मातीचे पाणी पूर्णपणे वाहून नैसर्गिक जलस्रोतात मिसळत आहे. त्यामुळे पिण्याचे पाणी दूषित होऊन ग्रामस्थ सातत्याने आजारी पडत आहेत खाणीवर काम करणारे कामगार हे उघड्यावर शौचालयास बसत असून पावसात ही घाण वाहून पाण्यात जात असल्यामुळेही आरोग्यास धोका निर्माण झाला असल्याचे ग्रामस्थ म्हणाले
प्रशासनाच्या कारवाईकडे ग्रामस्थांचे लक्ष
गावातील पिण्याच्या पाण्याची सुरक्षितता, सार्वजनिक हित, पर्यावरण आणि नैसर्गिक जलस्रोतांचे संरक्षण हा प्रश्न असल्याने प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहावे, अशीच स्थिती कायम राहिल्यास पूर्ण गावातील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात येणार आहे. जलस्रोतांचे नुकसान होत असल्याने उत्खनन तातडीने थांबवून संबंधितांवर कारवाई करावी अन्यथा येत्या चार दिवसात उग्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.