सावंतवाडी,दि.२३ ऑगस्ट
सावंतवाडी शहराची छान व पर्यटकांचे आकर्षण असलेल्या मोती तलावातील पाणी हे सांडपाणी व गटाराच्या पाण्यामुळे दूषित झाले आहे. त्याची तातडीने स्वच्छता करून योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी सावंतवाडी माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी सावंतवाडी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याजवळ केली आहे.
भोगटे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सावंतवाडी मोती तलाव हा शहराची ओळख आहे. सध्या प्रशासनाचे तलावाकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. शहरातील काही भागांमधील घरांचे सांडपाणी तलावात सोडले जात आहे. तसेच तलावाभोवती असलेल्या काही इमारतींचे ड्रेनेजचे पाणीही तलावात जाते. त्यामुळे तलावातील पाणी दूषित होत असून, त्याचा शहराच्या सौंदर्यावर तसेच पर्यावरणावर परिणाम होत आहे. गणपती विसर्जनासाठी याच तलावाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. हिंदू धर्मातील हा मोठा सण नागरिक मोठ्या श्रद्धेने साजरा करतात. मात्र, तलावातील पाणी दूषित असल्याने विसर्जनानंतर तलावाच्या स्थितीवर आणखी परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तलावातील पाणी स्वच्छ व विनादूषित ठेवण्यासाठी तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तलावात सांडपाणी सोडले जाणारे मार्ग तातडीने बंद करावेत, तलाव परिसराची स्वच्छता करावी तसेच मोती तलावाचे सौंदर्य आणि पर्यावरण अबाधित ठेवण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी शहर हितवर्धक मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी नगरपरिषदेने या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष द्यावे, असे आवाहन केले.
तसेच स्मशानभूमीत दहनाच्यावेळी लागणारी जळावू लाकडे ही मोफत पुरविण्यासाठीची मागणी त्यांनी नगराध्यक्षांना पत्राद्वारे केली. जळावासाठीची ३००० रुपयांच्या दरम्यान असलेली ही रक्कम फार मोठी असून ती गोरगरीब कुटुंबासाठी त्रासदायक आहे. वेंगुर्ले नगरपरिषदेने जळावासाठीची लाकडाची रक्कम पूर्ण मोफत केली असून त्या धर्तीवर सावंतवाडी नगरपरिषदेने सुध्दा कार्यवाही करून नागरीकांना दुःखद प्रसंगी दिलासा मिळेल असा निर्णय घ्यावा असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी माजी उपनगराध्यक्ष उमाकांत वारंग, माजी नगरसेवक सुरेश भोगटे, सीताराम गावडे, सत्यजित धारणकर, आबा पिंगुळकर, महेश नार्वेकर, रत्नाकर माळी आदी उपस्थित होते.