बालकांच्या पोषणाबाबत हयगय सहन केली जाणार नाही; तज्ज्ञांच्या मदतीने स्थानिक हवामानाला अनुरूप मेनूचा प्रस्ताव करणार
बांदा,दि.२८ ऑगस्ट
एकात्मिक बालविकास सेवा योजना (ICDS) अंतर्गत अंगणवाडीतील बालकांना देण्यात येणाऱ्या ‘टेक होम राशन’ (THR) च्या गुणवत्तेबाबत सामाजिक कार्यकर्ते गुरु कल्याणकर व ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बांदेकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची जिल्हा परिषद महिला व बालविकास समितीच्या सभापती अनुराधा नारकर यांनी तातडीने दखल घेतली. बालकांच्या आरोग्याशी संबंधित विषय असल्याने नारकर यांनी संबंधित अधिकारी, पोषण आहार पुरवठादार आणि तक्रारदार यांची बैठक घेऊन संपूर्ण विषयाची माहिती जाणून घेतली.
बैठकीदरम्यान तक्रारदारांनी प्रत्यक्ष पोषण आहाराची पाकिटे व त्यातील आहाराचा दर्जा निदर्शनास आणून दिला. स्थानिक हवामानातील आर्द्रतेमुळे पॅकेटमधील पोषण आहार खराब होत असून तो बालकांच्या सेवनासाठी अयोग्य ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या देण्यात येणारा प्रिमिक्स आहार कोकणातील हवामानाच्या परिस्थितीला अपेक्षित स्वरूपात अनुकूल नसल्याचा मुद्दाही यावेळी मांडण्यात आला.
आहारातील घटक तसेच त्याची निर्मिती आणि साठवणूक पद्धती ठरविताना स्थानिक हवामान व आहार संस्कृतीचा विचार करण्याची गरज असल्याचे तक्रारदारांनी निदर्शनास आणून दिले. शासनाकडून बालकांना योग्य पोषण मिळावे यासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च करून पोषण आहार पुरविला जात असला, तरी आहाराचा दर्जा किंवा तो स्थानिक परिस्थितीला अनुकूल नसल्यास बालकांकडून त्याचा अपेक्षित वापर होत नाही. त्यामुळे शासनाचा मूळ उद्देश साध्य होत नसल्याची भूमिका त्यांनी मांडली.
सध्याच्या प्रिमिक्स आहाराऐवजी स्थानिक हवामान व खाद्यपद्धतीला अनुरूप अधिक सकस व पोषक आहार उपलब्ध करून द्यावा, तसेच आहाराचे वितरण करण्यापूर्वी त्याची प्रयोगशाळेत तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली. यासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्याची मागणीही तक्रारदारांनी केली.
पॅकिंगमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश
बालकांच्या पोषणाचा विषय गांभीर्याने घेत अनुराधा नारकर यांनी संबंधित अधिकारी व पुरवठादारांशी सविस्तर चर्चा केली. यावेळी पोषण आहाराच्या पॅकिंगच्या दर्जात सुधारणा करण्याचे पुरवठादाराकडून मान्य करण्यात आले. मात्र, पोषण आहाराचा मेनू बदलणे हा धोरणात्मक निर्णय असल्याचे पुरवठादाराच्या प्रतिनिधींनी स्पष्ट केले.
नारकर यांनी बालकांच्या आरोग्याशी संबंधित या विषयाकडे केवळ प्रशासकीय बाब म्हणून न पाहता प्रत्यक्ष समस्या समजून घेण्यावर भर दिला. आहाराचा दर्जा, वितरण व्यवस्था आणि बालकांना त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळतो की नाही, यावर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
तज्ज्ञांच्या मदतीने स्थानिक हवामानानुसार मेनू
‘बालकांच्या आरोग्याच्या बाबतीत कोणतीही हयगय सहन केली जाणार नाही. आहारतज्ज्ञ, डॉक्टर व संबंधित तज्ज्ञांची बैठक घेऊन कोकणातील हवामान व स्थानिक परिस्थितीला अनुरूप पोषक खाद्यपदार्थांचा मेनू तयार करण्यात येईल. त्यानुसार शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल. या विषयावर यापुढे विशेष लक्ष ठेवून वेळोवेळी आढावा घेण्यात येईल,’ असे जिल्हा परिषद महिला व बालविकास समितीच्या सभापती अनुराधा नारकर यांनी सांगितले.
नारकर यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांची प्रशासकीय पातळीवर गांभीर्याने दखल घेण्यात आली असून, बालकांना अधिक दर्जेदार व स्थानिक परिस्थितीला अनुरूप पोषण आहार मिळण्याच्या दृष्टीने पुढील कार्यवाहीला वेग येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
बैठकीस सभापती अनुराधा नारकर, सावंतवाडी पंचायत समितीच्या सभापती सुस्मिता जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (म. बा. क.) प्रतीक उगारे, बाल विकास प्रकल्प अधिकारी छाया घाडिगावकर, सामाजिक कार्यकर्ता व तक्रारदार गुरु कल्याणकर, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बांदेकर, पोषण आहार पुरवठादार रुपेश लोटणकर, योगेश माने,उपसरपंच रत्नाकर आगलावे, ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत, अंगणवाडी सेविका वर्षा आगलावे आदी उपस्थित होते.