बांदा :ई-पिक पाहणीच्या सॉफ्टवेअरचा गोंधळ; शेतकरी वैतागले!

शेअर करा

व्हाईस चेअरमन विश्वनाथ नाईक : नुकसान डोळ्यांना दिसते, मात्र सॉफ्टवेअरमध्ये नोंदच होत नसल्याने नुकसानभरपाईची चिंता

बांदा ,दि.०१ ऑक्टोंबर
पाडलोस गावातील शेतकऱ्यांना ई-पिक पाहणी करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी तातडीने दूर करून प्रभावी यंत्रणा उभारावी, अशी मागणी पाडलोस विकास सहकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन विश्वनाथ नाईक यांनी प्रशासनाकडे केली आहे. शासनाच्या निर्देशानुसार शेतकरी स्वतः लॉगिन करून ई-पिक पाहणी करण्याचा प्रयत्न करीत आहेत; मात्र प्रत्यक्ष शेतात गेल्यानंतर सॉफ्टवेअरमधील अडचणींमुळे पाहणी पूर्ण होत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी नाईक यांच्याकडे केली आहे.

शेतकरी लॉगिन केल्यानंतर अनेकदा एकही सातबारा दिसत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे ई-पिक पाहणीसाठी नेमलेल्या सहाय्यकांची मदत घ्यावी लागत आहे. त्यातही एका शेतकऱ्याचे वेगवेगळे सातबारा वेगवेगळ्या सहाय्यकांकडे असल्याने नेमका कोणाकडे संपर्क साधायचा, असा प्रश्न निर्माण होत आहे. परिणामी शासनाने सुविधा उपलब्ध करून दिली असतानाही शेतकऱ्यांना प्रत्यक्षात त्याचा लाभ घेण्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत.

दरम्यान, पाऊस गायब झाल्याने भातपिकावर मोठा परिणाम झाला असून अनेक ठिकाणी पिके करपली आहेत. शेतकऱ्यांचे नुकसान प्रत्यक्ष शेतात दिसत असले तरी ई-पिक पाहणीची नोंद तांत्रिक अडचणींमुळे झाली नाही, तर भविष्यात नुकसानभरपाई किंवा अन्य शासकीय योजनांच्या लाभापासून शेतकरी वंचित राहण्याची भीती आहे.

चौकट—–
प्रभावी अंमलबजावणी करा

शेतकऱ्यांना स्वतःच्या लॉगिनमधून सहज ई-पिक पाहणी करता यावी, यासाठी सॉफ्टवेअरमधील त्रुटी तातडीने दूर करून प्रभावी अंमलबजावणी करावी. कोणत्याही शेतकऱ्याची नोंद तांत्रिक कारणामुळे राहू नये, अशी मागणी विश्वनाथ नाईक यांनी केली आहे.

प्रतिक्रिया——-
ई-पिक पाहणी करताना येणाऱ्या समस्या तलाठ्यांच्या निदर्शनास आणून द्याव्यात. तलाठी व नेमलेले सहाय्यक संबंधित समस्या मार्गी लावून ई-पिक पाहणी करून देतील.

शेअर करा