Kankavli News:पिसेकामते सरपंच प्राजक्ता मुद्राळे यांच्या विरोधातील अविश्वास ठराव मंजुर

शेअर करा

ठरवाच्या बाजुने १६३ तर विरोधात ९३ मते : पोलीसांचा चोख बंदोबस्त

कणकवली,दि.२६ऑक्टोंबर

पिसेकामते ग्रामपंचायत सरपंच प्राजक्ता नितीन मुद्राळे यांच्या विरोधात उपसरपंच व सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. या अविश्वास ठरावावर पिसेकामते येथे सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडली. या मतदानात अविश्वास ठरावाच्या बाजूने १६३ तर ठरावाच्या विरोधात ९० मते पडले. तर २३ मते अवैध ठरली. त्यामुळे आता सरपंच प्राजक्ता मुद्राळे यांच्या विरोधात बहुमत झाल्याने अविश्वास ठराव मंजुर झाला आहे.
पिसेकामते ग्रामपंचायतच्या उपसरपंचासह सदस्यांनी ६ आॅक्टोंबर रोजी तहसीलदार यांच्याकडे अविश्वास रावाचा प्रस्ताव दाखल केला होता. उपसरपंच सुहास कदम, सदस्य संकेत राणे, देवेंद्र सावंत, रेश्मा चव्हाण, श्रावणी जाधव यांनी त्यावर सह्या केल्या होत्या. सरपंच यांचे काम समाधानकारक नसून सदस्यांशी समन्वय न ठेवता मनमानी कारभार करत आहेत. ग्रामस्थांच्या विविध कामांसाठी त्या ग्रा.पं.मध्ये उपलब्ध नसतात. सदस्य व ग्रामस्थांना विश्वासात घेत नाहीत. त्यामुळे त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर करण्यासाठी विशेष सभा बोलविण्यात यावी अशी मागणी उपसरपंच व सदस्यांनी केली होती.
तहसीलदार यांच्या उपस्थितीत १३ आॅक्टोंबर रोजी बैठक घेण्यात आली. त्यानंतर १९ आॅक्टोबर रोजी सरपंच प्राजक्ता मुळे यांनी कणकवली सभापती यांच्याकडे आपला पदाचा राजीनामा दिला होता. त्याच्या खरेपणाची खात्री करण्यासाठी २३ आॅक्टोबर रोजी ग्रा.पं.मध्ये सरपंच व सदस्यांची बैठक घेण्यात आली. सरपंच प्राजक्ता मुद्राळे या मतदारांमधून थेट सरपंच म्हणून निवडून आल्याने अविश्वास ठरावावर मतदारांचा कल जाणून घेण्यासाठी २६ आॅक्टोंबर रोजी ग्रामसभा घेत मतदान घेण्यात आले.
पिसेकामते ग्रा.पं.च्या तीन प्रभागांमधून हे मतदान घेण्यात आले. कणकवली पं.स.चे गटविकास अधिकारी अरूण चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी सकाळी १०.३० वा. मतदान सुरू करण्यात आले. त्यासाठी ग्रा.पं. कार्यालयासमोर मंडप उभारून मतदान यंत्रणा सज्ज करण्यात आली होती. मतदारांना केंद्रात येण्यासाठी एक तासाची मुभा देण्यात आली. ११.३० वा. पर्यंत मतदारांना प्रवेश देण्यात आला. मतदान पूर्ण झाल्यानंतर तेथेच मत मोजणी करण्यात आली. मतमोजणीमध्ये प्रभाग १ मध्ये ठरावाच्या बाजुने ८१ तर विरोधात २६ मते पडली. प्रभाग २ मध्ये ठरावाच्या बाजुने ४२ तर विरोधात ५३ मते पडली. तर प्रभाग ३ मध्ये ठरावाच्या बाजुने ४० तर विरोधात ११ मते पडली. प्रभाग २ मधुन सरपंच प्राजक्ता मुद्राळे यांच्या बाजुने मतदारांचा कौल दिसून आला. या प्रभागात ठरावाच्या विरोधात अधिकची मते पडली.
मतदान सुरळीत पार पडावे यासाठी यंत्रणा सज्ज होती. सहाय्यक गटविकास अधिकारी मंगेश वालावलकर, विस्तार अधिकारी आर. एल. शिंदे, पी.जी. कदम, प्रमोद ठाकूर, विठ्ठल ठाकूर, प्रथम जाधव, कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी मनोज सावंत यांच्यासह पंचायत समिती अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आरोग्य विभागाकडूनही पथक तैनात करण्यात आले होते. मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार होवू नये यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

शेअर करा