निखिल कन्स्ट्रक्शनला ब्लॅकलिस्ट करा ; फोंडा घाटातील रस्ता बंद करण्याचा दिला इशारा
कणकवली,दि.२७ऑक्टोंबर
देवगड-निपाणी मार्गावरील फोंडा घाट ते दाजीपूर परिसरातील रस्त्याचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू असून, या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता आणि निकृष्ट दर्जाचे काम होत आहे. फोंडा घाटातील रस्त्याची दुरवस्था झाल्याने हा मार्ग वाहनचालकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. संबंधित निखिल कन्स्ट्रक्शन कंपनीला प्रशासनाने काळ्या यादीत टाकावे, तसेच रस्त्याच्या कामाची तातडीने गुणवत्ता तपासणी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी केली. अन्यथा फोंडाघाट रस्ता रोखला जाईल , असा इशाराही त्यांनी दिला.
कणकवलीत पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, जिल्ह्यात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांना आपला विरोध नसून, रस्ते चांगले आणि दर्जेदार झालेच पाहिजेत, अशी आपली भूमिका आहे. रस्त्यांवरील खड्डे, अपघात आणि दुर्घटनांच्या वेळीही आपण मदत करत असतो. मात्र, विकासकामांच्या नावाखाली निकृष्ट दर्जाचे काम खपवून घेतले जाणार नाही. देवगड निपाणी रस्त्यावरील फोंडा घाटातील काम गेल्या वर्षभरापासून सुरू असून, संपूर्ण घाट खोदून ठेवण्यात आला आहे. मात्र, कामाचा वेग, नियोजन आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा अभाव यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. घाटात ठिकठिकाणी खड्डे पडले असून, वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. याठिकाणी दिशादर्शक फलक, योग्य सूचना फलक आणि अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळण्यासाठी आवश्यक यंत्रणा नसल्याचा आरोप अनंत पिळणकर यांनी केला.
फोंडा चेकपोस्ट ते फोंडा घाटाच्या पायथ्यापर्यंत सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह आहेत. काँक्रिटच्या कामात मोठ्या प्रमाणात ग्रीट, सिमेंट आणि इतर साहित्याच्या वापर केला जात आहे. रस्ता वरून चांगला दिसत असला तरी त्याची प्रत्यक्ष गुणवत्ता तपासणे आवश्यक आहे. संबंधित विभागाने रस्त्याच्या काँक्रिटची तांत्रिक तपासणी करून कामाचा दर्जा निश्चित करावा. ठेकेदार आणि कंपनीच्या व्यवस्थापनाचे कामाच्या ठिकाणी पुरेसे नियंत्रण नाही. घाटात एखादे वाहन पलटी झाल्यास किंवा खड्ड्यात अडकल्यास मदत मिळण्यास विलंब होत आहे. त्यामुळे अपघातग्रस्तांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून, संबंधित ठेकेदाराने घटनास्थळी आवश्यक मनुष्यबळ आणि मदत यंत्रणा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी अनंत पिळणकर यांनी केली.
बॉक्स –
पर्यटन व्यवसायावरही परिणाम होण्याची भीती
सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा असून, मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, कराड आणि सातारा यांसह विविध भागांतून पर्यटक जिल्ह्यात येत असतात. वेंगुर्ला, मालवण, देवगड, सिंधुदुर्ग किल्ला, सावंतवाडी आणि दोडामार्ग या पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या पर्यटकांना खराब रस्त्यांमुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. फोंडा घाटातील रस्त्याची अशीच अवस्था कायम राहिल्यास पर्यटक जिल्ह्यात येण्याबाबत पुनर्विचार करू शकतात. त्याचा परिणाम जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायावर होण्याची भीती अनंत पिळणकर यांनी व्यक्त केली.