Vengurla news : वेंगुर्ल्यातील रंबलर्स आठ दिवसांत हटवा!

शेअर करा

जय हनुमान मित्रमंडळ, जुना स्टँड यांची मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांच्याकडे मागणी

वेंगुर्ला,दि.२७ऑक्टोंबर

शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी बसविण्यात आलेले रंबलर्स तात्काळ हटवावेत, अशी मागणी जय हनुमान मित्रमंडळ, जुना स्टँड यांच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात मित्रमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व शहरातील ग्रामस्थानी वेंगुर्ला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. तसेच शहराच्या सुशोभीकरणासाठी बसविण्यात आलेले पथदीप दररोज सायंकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत सुरू ठेवावेत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
वेंगुर्ला शहरातील शिरोडा नाका, दाभोली नाका ते वेंगुर्ला बंदर रोडवर वाहनांचा वेग कमी करण्याच्या उद्देशाने रंबलर्स बसविण्यात आले आहेत. मात्र, या रंबलर्समुळे विशेषतः छोट्या वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. वाहनांना वारंवार बसणाऱ्या धक्क्यांमुळे वाहनांची दुरवस्था होत असून, वाहनचालकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित रस्त्यांवरील रंबलर्स तात्काळ हटविण्यात यावेत, अशी ठाम मागणी जय हनुमान मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आली आहे. नगरपरिषद प्रशासनाने येत्या आठ दिवसांत हे रंबलर्स हटविण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.

आठ दिवसांची मुदत; अन्यथा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास नगरपरिषद जबाबदार!

रंबलर्स हटविण्याबाबत नगरपरिषद प्रशासनाने आठ दिवसांच्या आत कार्यवाही करावी. अन्यथा पुढील कार्यवाहीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी नगरपरिषद प्रशासनाची राहील, असा इशारा जय हनुमान मित्रमंडळ, जुना स्टँड यांच्या वतीने मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांना देण्यात आला आहे.

सुशोभीकरणाचे दिवे सायंकाळी सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत सुरू ठेवा!

दरम्यान, वेंगुर्ला शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी सुशोभीकरणाच्या दृष्टीने पथदीप बसविण्यात आले आहेत. या दिव्यांचा पुरेपूर उपयोग व्हावा आणि शहराचे सौंदर्य अधिक खुलून दिसावे, यासाठी हे दिवे दररोज सायंकाळी ६ वाजल्यापासून सकाळी ६ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात यावेत, अशी मागणीही मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी माजी नगरसेवक नागेश उर्फ पिंटू गावडे, विकी गावडे, कृष्णा गावकर, अनुप गावडे, गोट्या गावडे, सुमित गावडे, विकास कोरगावकर, गौरव गिरप, दीपेश गावडे, रोशन गावडे, सतेज मयेकर, महेश गावकर, जगन्नाथ खवणेकर, गिरीष मांजरेकर, मंदार गावडे यांच्यासह जय हनुमान मित्रमंडळाचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

शेअर करा