कणकवली एसटी विभाग नियंत्रकांना निवेदन; परवानगी न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा!
आचरा,दि.२७ऑक्टोंबर(अर्जुन बापर्डेकर)
आचरा येथून कणकवली ला विक्रीला जाणा-या मच्छीमार महिलांना एसटीबस मधून मासे विक्री साठी अडकाठी होऊ लागल्याने संबंधित महिलांनी आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक यांना लेखी पत्र देत परवानगी न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी सरपंच जेरॉन फर्नांडिस, ग्रामपंचायत सदस्य चावल मुजावर,मच्छि विक्रेत्या महिला
विशाखा खवणेकर,छाया पराडकर,मनस्वी तोडणकर,गौरी सारंग,दिक्षा जोशी, सुवर्णा पराडकर,विमल बापर्डेकर, सुचिता तोडणकर,मिनल धुरी,माधूरी सारंग आदी उपस्थित होत्या.या पत्रात
आचरा बंदर परिसरातील अनेक मच्छी विक्रेते हे मच्छी विक्रीच्या व्यवसायावर आपली उपजीविका करीत आहेत. सदर मच्छी विक्रेत्यांना आचरा बंदर येथून कणकवली येथे मच्छी विक्रीसाठी वाहतूक करण्याकरिता योग्य सुविधा उपलब्ध नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात अडवणूक व त्रास सहन करावा लागत आहे. संदर्भीय पत्रानुसार रा.प. प्रवासी बसमधून मच्छीची वाहतूक करण्यास आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्यामुळे मच्छी विक्रेत्यांना त्यांच्या व्यवसायासाठी मच्छी कणकवली येथे घेऊन जाणे शक्य होत नाही. परिणामी त्यांच्या दैनंदिन व्यवसायावर विपरीत परिणाम होत असून आर्थिक नुकसानही सहन करावे लागत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
तरी आचरा बंदर परिसरातील मच्छी विक्रेत्यांची अडचण विचारात घेऊन रा.प. प्रवासी बसमधून मच्छीची वाहतूक करण्यास आवश्यक त्या अटी व शर्तींच्या अधीन राहून परवानगी देण्यात यावी. तसेच मच्छीची वाहतूक करताना प्रवाशांना कोणताही त्रास होणार नाही, स्वच्छता राखली जाईल व मच्छी सुरक्षितपणे वाहून नेता येईल यासाठी योग्य ती व्यवस्था करण्यात यावी. ही विनंती. अन्यथा मच्छीविक्रेत्यांमार्फत आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.