बांदा,दि.१३ ऑगस्ट
शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांनी घरपट्टी वसुलीसाठी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे पाडलोस ग्रामपंचायतीने एप्रिल ते जुलै या कालावधीत घरपट्टीची तब्बल ६६ टक्के वसुली केली आहे. ग्रामस्थांना घरपट्टीमध्ये ५ टक्के सवलत देण्यात आल्याने वसुलीला चांगला प्रतिसाद मिळाला असून, शंभर टक्के वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा ग्रामपंचायतीचा मानस असल्याचे सरपंच सलोनी पेडणेकर यांनी सांगितले.
याबाबत सरपंच पेडणेकर यांनी माहिती देताना ग्रामस्थांच्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले. घरपट्टी वसुलीसाठी ग्रामपंचायतीकडून सातत्याने जनजागृती करण्यात येत असून, नागरिकांनी वेळेत घरपट्टी भरून ग्रामपंचायतीला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
यावेळी उपसरपंच राजू शेटकर यांनी घरपट्टी वसुलीसाठी सहकार्य करणाऱ्या सर्व ग्रामस्थांचे आभार मानले.
शेतकऱ्यांची रील
घरपट्टीमध्ये ५ टक्के सवलत असल्याची माहिती शेतात शेतीची कामे करतानाच रीलच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचविणाऱ्या शेतकरी छाया नाईक व विश्वनाथ नाईक यांचेही मोलाचे सहकार्य लाभल्याचे ग्रामसेवक प्रतिभा आळवे यांनी सांगितले. त्यांच्या या उपक्रमामुळे घरपट्टी भरण्याबाबत ग्रामस्थांमध्ये जागृती निर्माण होण्यास मदत झाल्याचे आळवे यांनी सांगितले.