हेल्मेट व सीटबेल्ट वापराचा संदेश देत पोलिसांनी दिला ‘सुरक्षित प्रवासाचा’ कानमंत्र; पोलीस निरीक्षक शाम बुवा यांच्या उपक्रमाचे कौतुक
देवगड,दि.२८ ऑगस्ट
राखी पौर्णिमेच्या निमित्ताने बहीण-भावाच्या नात्यातील प्रेम आणि सुरक्षिततेचा संदेश देत देवगड पोलिसांनी वाहनचालकांमध्ये हेल्मेट व सीटबेल्टच्या वापराबाबत जनजागृती करण्यासाठी आगळावेगळा उपक्रम राबविला. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांच्या सूचनेनुसार देवगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शाम बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. सुरक्षित वाहनचालना आणि वाहतूक नियमांचे पालन करण्याचा संदेश या माध्यमातून वाहनचालकांना देण्यात आला.
रस्ते अपघातांमध्ये हेल्मेट आणि सीटबेल्टचा वापर जीव वाचविण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतो. मात्र, आजही अनेक वाहनचालक वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करताना दिसतात. अशा बेशिस्त वाहनचालकांना केवळ दंडात्मक कारवाईचा धाक न दाखवता, त्यांच्या सुरक्षिततेची जाणीव करून देण्याच्या उद्देशाने देवगड पोलिसांनी राखी पौर्णिमेचा हा अनोखा उपक्रम राबविला.
राखी हा केवळ प्रेमाचा धागा नसून आपल्या प्रिय व्यक्तीच्या सुरक्षिततेची जबाबदारीही अधोरेखित करणारा सण आहे. याच भावनेतून वाहन चालवताना स्वतःची तसेच आपल्या कुटुंबीयांची सुरक्षितता जपावी, हेल्मेटचा वापर करावा, चारचाकी वाहन चालविताना सीटबेल्ट लावावा आणि वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असा संदेश पोलिसांनी दिला.
यावेळी देवगड पोलीस निरीक्षक शाम बुवा यांनी पोलिसांच्या या उपक्रमामागील भूमिका स्पष्ट करताना समाजामध्ये विविध माध्यमातून वाहतूक सुरक्षेबाबत जनजागृती करणे आवश्यक असल्याचे सांगितले. वाहनचालकांनी घाई, निष्काळजीपणा आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन टाळून सुरक्षित प्रवास करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
पोलिसांकडून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्येही सकारात्मक संदेश गेला. दंडात्मक कारवाईसोबतच सामाजिक बांधिलकीतून जनजागृती करण्याचा देवगड पोलिसांचा हा प्रयत्न कौतुकास्पद असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
‘हेल्मेट वापरा, सीटबेल्ट लावा आणि आपल्या कुटुंबासाठी सुरक्षित घरी परता,’ असा भावनिक तसेच सामाजिक संदेश देत देवगड पोलिसांनी राखी पौर्णिमेच्या निमित्ताने वाहनचालकांना सुरक्षिततेची राखी बांधल्याचे चित्र पाहायला मिळाले.
यावेळी देवगड पोलीस निरीक्षक शाम बुवा तसेच सहाय्यक उप पोलीस निरीक्षक हेडकॉन्स्टेबल प्रवीण सावंत प्रसाद आचरेकर,प्रणीला आचरेकर गंगा एडगेरवींद्र महाले तसेच होमगार्ड उपस्थित होते
