फोंडाघाट,दि.२४ ऑगस्ट (संजय सावंत)
फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीच्या कला आणि वाणिज्य महाविद्यालय, फोंडाघाट येथे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियम, रस्ता सुरक्षा आणि जबाबदार वाहनचालकाची भूमिका याबाबत जनजागृती करण्यासाठी रस्ता सुरक्षा अभियान उत्साहात संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी एनएसएस विभागप्रमुख प्रा. जगदीश राणे यांनी प्रास्ताविकातून रस्ता सुरक्षा अभियानाची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, रस्ते अपघात केवळ वाहनांच्या वेगामुळे होत नाहीत, तर वाहतूक नियमांकडे होणारे दुर्लक्ष, निष्काळजीपणा आणि चुकीच्या सवयी हेही अपघातांचे प्रमुख कारण आहे. विद्यार्थ्यांनी स्वतः वाहतूक नियमांचे पालन करण्याबरोबरच आपल्या कुटुंबीयांमध्ये व समाजातही रस्ता सुरक्षेबाबत जागृती निर्माण करावी. NSSच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरंधर नारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, वाहतूक नियमांचे पालन करणे ही केवळ कायदेशीर जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे नैतिक कर्तव्य आहे. दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर, चारचाकी वाहनात सीट बेल्ट लावणे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळणे तसेच मद्यपान करून वाहन न चालविणे या बाबी प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवल्या पाहिजेत. स्वतःच्या सुरक्षिततेबरोबरच रस्त्यावरून जाणाऱ्या इतर व्यक्तींच्या जीविताचीही काळजी घेणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी रस्ता सुरक्षा संदेश आपल्या मित्रपरिवारापर्यंत पोहोचवून ‘सुरक्षित प्रवास, सुरक्षित जीवन’ हा विचार समाजात रुजवावा, असे आवाहन त्यांनी केले.
कणकवली येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पवार यांनी विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांची प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि कायदेशीर बाबी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, रस्त्यावर वाहन चालविताना काही क्षणांची घाई आयुष्यभराचे नुकसान करू शकते. वाहनाचा वेग परिस्थितीनुसार नियंत्रित ठेवणे, वाहतूक सिग्नलचे पालन करणे, ओव्हरटेक करताना योग्य दक्षता घेणे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर न करणे आणि दुचाकीस्वारांनी दर्जेदार हेल्मेटचा योग्य पद्धतीने वापर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वाहतूक नियम मोडल्यास होणाऱ्या कायदेशीर कारवाईची माहितीही त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. ‘नियम पाळा, अपघात टाळा’ हा संदेश प्रत्येकाने आपल्या आचरणातून प्रत्यक्षात आणावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी गणेश पवार यांनी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्ती व शिस्तीबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी तंबाखू, गुटखा, सिगारेट, दारू व अमली पदार्थांसह विविध व्यसनांचे प्रकार आणि त्यांचे शारीरिक, मानसिक, आर्थिक व कौटुंबिक दुष्परिणाम स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी वाईट संगत टाळून क्रीडा व सकारात्मक उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे, व्यसनापासून दूर राहावे आणि गरज भासल्यास पालक, शिक्षक व तज्ज्ञांची मदत घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. तसेच वेळेचे नियोजन, नियमांचे पालन आणि शिस्तीचे महत्त्व अधोरेखित करून विद्यार्थ्यांनी जबाबदार नागरिक बनावे, असे सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संस्थेचे चेअरमन महेश सावंत यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात रस्ता सुरक्षा ही सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, देशाच्या विकासासाठी तरुणांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे आणि या तरुण पिढीने सुरक्षित वाहतुकीचा आदर्श निर्माण केला पाहिजे. पालकांनी मुलांना वाहन देताना केवळ वाहन चालविण्याचे प्रशिक्षण न देता वाहतूक शिस्त आणि जबाबदारीची जाणीवही करून द्यावी. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी रस्ता सुरक्षेचे दूत बनून समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर पोलीस हवालदार सुभाष शिवगण, पोलीस कॉन्स्टेबल स्नेहा बर्गे, श्रीकांत महामुनी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.