बंद एनटीसी मिल पूर्ववत चालू होण्याची आशा, विधान परिषद उपसभापती सचिन अहिर यांनी व्यक्त केला विश्वास!

शेअर करा

मुंबई,दि. १६ ऑगस्ट

राष्ट्रीय मिल मजदूर संघ आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या संयुक्त विद्यमाने परळ येथे ८० व्या भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त झेंडावंदन सोहळा पार पडला.याप्रसंगी विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या हस्ते झेंडारोहन पार पडले.त्यावेळी कामगार कार्यकर्त्यांपुढे ते बोलत होते. सरचिटणीस गोविंदराव मोहिते,खजिनदार निवृत्ती देसाई,उपाध्यक्ष रघुनाथ (अण्णा) शिर्सेकर,बजरंग चव्हाण, राजन लाड, सुनील बोरकर,सुनिल अहिर,सेक्रेटरी शिवाजी काळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
उपसभापती सचिन अहिर आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, दिल्लीमध्ये आपण केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांची भेट घेतली असता त्यांनी सांगितले की,या प्रश्नावर पंतप्रधानांना निवेदन देण्यात आले तर लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रश्न मार्गी लावला जाईल.उपसभापती सचिन अहिर यांनी गिरणी कामगारांपुढे बोलताना असाही विश्वास व्यक्त केला की,आतापर्यंत आपण घेण्याच्या भूमिकेत होतो,पण आता देण्याच्या भूमिकेत असल्याने बंद एनटीसी गिरण्यांचा प्रश्न मार्गी लागेल!
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात प्राणाची आहुती देणाऱ्या क्रांतिवीरांना अभिवादन करताना सचिन अहिर आपल्या भाषणात म्हणाले, भारतीय स्वातंत्र्य लढ्याला शूरवीरांचे आत्मसमर्पण आणि त्यागाची पार्श्वभूमी आहे! सचिन अहिर आपल्या भाषणात असेही म्हणाले,आपला भारत विविधतेकडून एकतेकडे वाटचाल करणारा देश असून सर्वधर्मसमभाव हा त्याचा आत्मा आहे. कोणा कवीने म्हटले आहे,”मजहब नही सिखाता,आपस में बैर रखना,हिंदी है हम वतन है हिंदोस्ताँ हमारा.” ही धार्मिक सद्भावना जोपासण्यामधूनच आपला देश पुढे जाणार आहे आणि तीच आपली खरी शक्ती आहे,असेही सचिन अहिर आपल्या भाषणात म्हणाले.
स्वतंत्र्य लढ्यात गिरणी कामगारांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले आहे,असे सांगून ते म्हणाले,गिरणी कामगार घराच्या न्याय हक्कापासून गिरणी कामगार वंचित राहता कामा नये. गिरण्यांच्या चाळींचे पुनर्वसन,खार जमिनीवरील घर बांधणी, बंद गिरण्यांच्या जमिनी घरासाठी उपलब्ध करून देणे या प्रश्नांचाही सकारात्मक उहापोह सचिन अहिर यांनी आपल्या आपल्या भाषणात केला.सेवा दलाचे प्रमुख लालचंद पांडे यांनी झेंडावंदन कवायतीचे सूत्रसंचालन केले.जी.डी.आंबेकर व शैक्षणिक इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी या झेंडावंदनमध्ये सहभागी झाले होते
ऐश्वर्या अहिर यांच्याकडे पदभार!
स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने ऐश्वर्या सचिन अहिर यांना सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्याहस्ते नियुक्तीचे पत्र देऊन सेक्रेटरी म्हणून पदभार सोपविण्यात आला.

शेअर करा