राज्यातील सर्वात मोठ्या कर्ज माफी सोबतच ७.५ एचपीपर्यंत वीज बील माफी ; गोमांस वाहतूकीसाठी मदत करणा-या पोलीसांवर माझी नजर
कणकवली दि.२५ जुलै
महायुती सरकारने राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना सक्षम करण्याचे काम सुरू आहे. राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांसाठी ४२ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहिर केली आहे . तसेच राज्यातील शेतक-यांनी 7.5 एचपी पर्यंतचे वीज बील 48 हजार कोटींची माफ महायुती सरकारने केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केवळ घोषणा न करता कृतीतून शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम केले आहे, अशी माहिती मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.
कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते, यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, उपाध्यक्ष रणजीत देसाई, विधानसभा अध्यक्ष मनोज रावराणे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने विविध महत्त्वपूर्ण योजना राबविल्या आहेत. महिला शेतकऱ्यांना आधार देण्याबरोबरच कृषी क्षेत्रात बदल घडवून आणण्यासाठी नवीन धोरणे आखण्यात आली आहेत. जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, महिला शेतकरी सक्षमीकरण, सौरकृषी वाहिनी, सौरपंप, पीक विमा, कृषी यांत्रिकीकरण, डिजिटल तंत्रज्ञान आणि एआयचा वापर, तसेच डेटा ड्रोनद्वारे शेती व्यवस्थापन यांसारख्या उपक्रमांमुळे शेती अधिक सक्षम होत आहे. ख-या अर्थाने कोकणातील शेतकरी नियमित कर्जफेड करतात त्यांच्यासाठी ५० हजार रुपयांचा प्रोत्साहन निधी दिला जाणार आहे. पीक विम्याची रक्कम काही शेतकऱ्यांना मिळाली असून, ज्या भागातील शेतकरी अद्याप विम्याच्या लाभापासून वंचित आहेत, त्याबाबत पाठपुरावा सुरू आहे. शेतकऱ्यांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही. संबंधित विमा अधिकाऱ्यांना मंत्रालय स्तरावर बोलावून याबाबत चर्चा करण्यात आली असून, विमा प्रक्रियेत होणाऱ्या त्रुटी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.
हवामान बदलामुळे शेतीवर होणारे परिणाम लक्षात घेता जिल्ह्यातील हवामान केंद्रे किती कार्यरत आहेत आणि किती बंद आहेत, याचा कृषी विभागाने अभ्यास करावा, अशी मागणी आपण कृषिमंत्र्यांकडे केली आहे. हवामानाच्या अचूक नोंदी आणि त्यानुसार पीक विम्याची रक्कम निश्चित करण्याच्या प्रक्रियेचा फेरविचार करण्याची गरज आहे.जिल्ह्यात वीज वितरण कंपनीकडून ५०० पोल उपलब्ध झाले असून, काम करणारी टीमही दाखल झाली आहे. त्यामुळे वीज समस्येबाबत नागरिकांची नाराजी कमी होत आहे. ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून, सणासुदीच्या काळात नागरिकांना वीजपुरवठ्याबाबत अडचणी येऊ नयेत, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. स्मार्ट मीटर बसविताना कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करू नये, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले असल्याने तशा कोणाच्याही तक्रारी असतील तर आम्हाला कळवा , असे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.
मच्छीमारांना कृषीचा दर्जा देण्याच्या निर्णयामुळे त्यांना कृषी क्षेत्रातील विविध योजनांचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे. यासंदर्भातील शासन निर्णय लवकरच निघेल. बंदर व मत्स्य विभागात 240 पदे भरण्याची प्रक्रिया सुरु झाली. आता रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. जिल्ह्यातील तरुणांना जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी मिळाव्यात, हा सरकारचा प्रयत्न आहे.दरम्यान, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार तरुणांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. नीट परीक्षेच्या प्रश्नावर केंद्र सरकारने कठोर निर्णय आहेत. शिक्षणमंत्र्यांनीही राजीनामा दिला आहे. देशविरोधी कारवायांना कोणत्याही परिस्थितीत थारा दिला जाणार नाही, कारण दिल्लीतील आंदोलनातील 200 अकाऊंट ही पाकीस्तान मधुन चालवली जात होती, असे दिल्ली पोलीसांचे म्हणणे आहे.महायुती सरकारच्या कार्यकाळात आगामी साडेतीन वर्षांत शेतकरी, मच्छीमार, तरुण आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी आणखी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातील. पुढील काळातील पाच वर्षे राज्याच्या विकासासाठी महत्त्वाची ठरणार असून, सरकारच्या योजनांचा लाभ जिल्ह्यातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.
गोमांस वाहतुक होत असलेल्या चेकनाक्यांवर माझे लक्ष-
सावंतवाडी परिसरात गोमांस वाहतुकीच्या प्रकाराबाबत गंभीर बाब आहे. दोन्ही तपासणी नाक्यांवर कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचारी व अधिका-यांमधील कोण जर बिर्याणी खात असतील तर केव्हातरी गळ्याला लागेल. माझा लक्ष संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचा-यांवर आहे. केव्हातरी मला अचानक भेट द्यावी लागेल.याबाबत पोलीस अधिक्षकांशी माझी चर्चा झाली आहे. लवकरच संबंधितांवर कठोर कारवाई होईल , असा इशारा पालकमंत्री नितेश राणे यांनी दिला .