कणकवली,दि.१६ ऑक्टोंबर
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सांस्कृतिक आणि नाट्य क्षेत्रातील हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व, प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक आणि सर्वांच्या जिव्हाळ्याचे सुहास वरुणकर यांचे रविवार, ११ ऑक्टोबर २०२६ रोजी अकाली दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने सिंधुदुर्गच्या सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी झाली असून, नाट्य क्षेत्रासह विविध क्षेत्रांतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवार, १७ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता कणकवली कॉलेज येथील एच.पी.सी.एल. सभागृहात शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.
कणकवलीसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सांस्कृतिक क्षेत्रातील रंगकर्मी, नाट्यप्रेमी, सुहासदादांवर प्रेम करणारे चाहते आणि त्यांचे हितचिंतक या शोकसभेला उपस्थित राहणार आहेत. आपल्या कलागुणांनी आणि कार्याने सांस्कृतिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सुहासदादांच्या आठवणींना यावेळी उजाळा देण्यात येणार आहे.
सुहासदादांच्या अकाली जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून निघणे कठीण आहे. त्यांच्या कार्याचे स्मरण करून त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी सर्व रंगकर्मी आणि सुहासप्रेमींनी शनिवारी सकाळी १० वाजता एच.पी.सी.एल. सभागृह, कणकवली कॉलेज येथे उपस्थित राहावे, असे आवाहन समस्त शोकाकुल सुहास वरुणकर प्रेमी, रंगकर्मी व परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.