मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होईपर्यंत टोल बंद ठेवण्याची मागणी ; वाहनाधकंडकून टोलवसुली करणे अन्यायकारक
कणकवली,दि. १९ ऑगस्ट
मुंबई-गोवा महामार्गावरील ओसरगाव टोलनाक्यावरून स्थानिक वाहनधारकांकडून टोलवसुली करण्यास काँग्रेसने तीव्र विरोध केला आहे. महामार्गाची अनेक कामे अद्याप अपूर्ण असताना टोलवसुली सुरू करणे अन्यायकारक आहे, महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत टोलवसुली पूर्णपणे बंद ठेवावी, अशी मागणी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद मोंडकर यांनी केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, उपजिल्हाधिकारी तसेच टोल व्यवस्थापनाकडे निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर ,अतिश जेठे, प्रकाश जैतापकर, देवानंद लुडबे, बाळू मेस्त्री, जेम्स फर्नांडीस, महेश परब, सरदार ताजर आदी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मुंबई-गोवा महामार्गावर ओसरगाव येथे महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून टोलनाका उभारण्यात आला आहे. आयआरबी कंपनीकडून सोमवारी, १७ ऑगस्ट रोजी टोलवसुली सुरु करण्याचे नियोजन आहे.याबाबत जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी टोल कार्यालयात जाऊन व्यवस्थापनाकडे विचारणा केली. त्यावेळी ही केवळ ‘ट्रायल’ असल्याचे व्यवस्थापनाकडून सांगत बाजू मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.त्यामुळे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी स्थानिक प्रशासनाला पूर्वसूचना देत टोल कार्यालयात जाऊन व्यवस्थापनाशी चर्चा केली.
महामार्गाची कामे पूर्ण झाल्याशिवाय टोलवसुली सुरू करु नये. तसेच स्थानिक वाहनधारकांवर अतिरिक्त आर्थिक भार लादू नये. टोल व्यवस्थापनाने सध्या टोल सुरु करणार नसल्याचे तोंडी सांगत आठवडाभरात लेखी उत्तर देण्याचे आश्वासन दिले आहे.महामार्गावरील अनेक ठिकाणी अद्याप कामे अर्धवट असून काही भागांत रस्त्याची दुरवस्था झाली आहे. महामार्ग पूर्णत्वास गेलेला नसताना स्थानिक नागरिकांकडून टोलवसुली करणे योग्य नाही. ओसरगाव हे जिल्ह्याच्या मध्यवर्ती भागात असल्याने स्थानिक वाहनधारकांना वारंवार ये-जा करावी लागते. प्रत्येक वेळी टोल भरावा लागल्यास त्यांच्यावर मोठा आर्थिक भुर्दंड पडणार असल्याने हा टोलनाका जिल्ह्याच्या वेशीवर हलवावा, अशी मागणी श्री. मोंडकर यांनी केली.
दरम्यान, गणेशोत्सव जवळ येत असल्याने या काळात महामार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. टोलवसुलीच्या मुद्यावरून स्थानिक वाहनधारक आणि टोल कर्मचाऱ्यांमध्ये वाद अथवा संघर्ष निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने तातडीने योग्य त्या सूचना द्याव्यात, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे काँग्रेसने केली .महामार्ग प्राधिकरण तसेच टोलवसुली करणाऱ्या आयआरबी कंपनीला महामार्गाची कामे पूर्ण होईपर्यंत टोलवसुली बंद ठेवण्याच्या स्पष्ट सूचना द्याव्यात आणि स्थानिक वाहनधारकांवरील आर्थिक अन्याय दूर करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.