शाळांच्या विकासासाठी खंबीरपणे पाठीशी ;कनेडी बीटस्तरीय विशेष सहविचार सभेत शैक्षणिक गुणवत्तेसह पायाभूत सुविधांवर सखोल चर्चा
कणकवली,दि.३१ ऑगस्ट
बदलत्या काळानुसार शिक्षकांनीही स्वतःला अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील शाळांची शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी शिक्षकांनी कसोशीने प्रयत्न करावेत. शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच आवश्यक भौतिक सुविधांसाठी आपण सदैव खंबीरपणे पाठीशी उभे राहू, अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य संदेश सावंत यांनी दिली.
सांगवे ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित कनेडी बीटस्तरीय विशेष सहविचार सभेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. या सभेत कनेडी प्रभागातील विविध शाळांच्या पटसंख्येचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सखोल चर्चा करण्यात आली.

यावेळी संदेश सावंत यांनी चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षा तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये कनेडी बीटमधील जास्तीत जास्त विद्यार्थी गुणवत्ता यादीत यावेत, यासाठी शिक्षकांनी विशेष प्रयत्न करावेत. शाळेतील शंभर टक्के विद्यार्थ्यांना या परीक्षांना प्रविष्ट करून त्यांना योग्य मार्गदर्शन व सराव करून घेण्यावर भर देण्याची सूचना गोट्या सावंत यांनी केली.
डिजिटल शिक्षणाचा प्रभावी वापर करण्याची गरज व्यक्त करताना त्यांनी शाळांमध्ये उपलब्ध टीव्ही, लॅपटॉप यांसारख्या साधनांचा योग्य वापर करून विद्यार्थ्यांसाठी नवनवीन शैक्षणिक उपक्रम राबवावेत. शाळांच्या पायाभूत सुविधांचा विस्तार करताना पहिल्या टप्प्यात मोठ्या शाळांना वायफाय व सोलर सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. त्यानंतर कमी पटसंख्या असलेल्या शाळांनाही आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे गोट्या सावंत यांनी केले.
स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीलाही चालना मिळावी यासाठी बचत गटांच्या माध्यमातून शाळांच्या पोषण आहाराचे नियोजन करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच गणेशोत्सवाच्या निमित्ताने गावात येणाऱ्या माजी विद्यार्थ्यांशी संपर्क साधून त्यांच्या सहकार्याने शाळांच्या विकासासाठी विविध उपक्रम राबवावेत, असेही त्यांनी सांगितले.
सभेत शालेय व्यवस्थापन, विद्यार्थ्यांचे आरोग्य, स्वच्छता आणि पोषण आहार याबाबतही महत्त्वपूर्ण सूचना करण्यात आल्या. वर्गखोल्यांची नियमित स्वच्छता, मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची व्यवस्था, दर पंधरा दिवसांनी पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करणे, शाळांमध्ये परसबाग विकसित करून त्यामध्ये रानभाज्यांची लागवड करणे, खराब धान्याचे निरलेखन करणे आणि पोषण आहाराची अचूक नोंद ठेवणे यावर विशेष भर देण्यात आला.
याशिवाय विद्यार्थ्यांमधील मोबाईलच्या वाढत्या व्यसनाबाबत जागरूकता निर्माण करणे तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी माता-पालकांचे सक्रिय सहकार्य घेण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
या विशेष सहविचार सभेला कनेडी प्रभाग विस्तार अधिकारी प्रेरणा मांजरेकर, केंद्रप्रमुख शांताराम सावंत, प्रशांत बोभाटे, किरण सावंत, सांगवे सरपंच संजय सावंत, उपसरपंच प्रफुल्ल काणेकर यांच्यासह कनेडी प्रभागातील चारही केंद्रांमधील बहुसंख्य मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक व उपशिक्षक उपस्थित होते.