कणकवली,दि.२८ ऑगस्ट
वेंगुर्ला पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गोव्यातील पणजी येथून शिताफीने ताब्यात घेतले.
वेंगुर्ला पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता कलम 303(2) अन्वये मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेमार्फत समांतर तपास सुरू असताना पथकाला गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून धीरज दिलीप गुप्ता (वय 20, रा. गणेश नगर, कोलवले, गोवा) यास पणजी, गोवा येथून ताब्यात घेतले.
ताब्यात घेतल्यानंतर आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी त्याला वेंगुर्ला पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक मोहन दहिकर व अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार तसेच पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, ASI सुरेश राठोड, ASI डॉमीनिक डिसोझा, HC जॅकसन घोंसाल्विस, PC अमर कांडर, महेश्वर समजिस्कर व WPC धनश्री परब (सायबर) यांचा सहभाग होता.