वाचन प्रेरणा दिन व जिल्हा साहित्य संमेलनानिमित्त बॅ. नाथ पै सेवांगणच्या साने गुरुजी वाचन मंदिरातर्फे स्पर्धा; सकाळी ९.३० वाजता प्रारंभ.
मालवण,दि.१५ ऑक्टोंबर
मालवण धुरीवाडा येथील बॅ. नाथ पै सेवांगण संचलित साने गुरुजी वाचन मंदिरातर्फे वाचन प्रेरणा दिन आणि जिल्हा साहित्य संमेलनाचे औचित्य साधून तालुकास्तरीय ‘अभिवाचन स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवार, १८ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता होणार आहे.
वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणे, साहित्याची गोडी निर्माण करणे आणि प्रभावी अभिवाचनाच्या माध्यमातून साहित्याचा आशय रसिकांपर्यंत पोहोचविणे हा या स्पर्धेचा उद्देश आहे. स्पर्धेसाठी खुला गट आणि युवा गट असे दोन गट ठेवण्यात आले आहेत.
खुला गट : वय वर्षे २० व त्यापुढील स्पर्धकांसाठी खुला गट असून, या गटातील स्पर्धकांनी बॅ. नाथ पै यांच्या जीवनावर आधारित पुस्तक, लेख किंवा भाषणातील काही भागाचे अभिवाचन करायचे आहे.
युवा गट : इयत्ता नववी ते पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी युवा गट ठेवण्यात आला आहे. या गटातील स्पर्धकांनी महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेल्या साहित्याचा किंवा त्यांच्या जीवनावर आधारित पुस्तकातील काही भागाचे अभिवाचन करायचे आहे.
दोन्ही गटांतील स्पर्धकांना अभिवाचनासाठी चार अधिक दोन, म्हणजेच एकूण सहा मिनिटांचा वेळ देण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी एकूण १५ हजार रुपयांची पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.
स्पर्धेतील बक्षीस वितरण समारंभ २१ नोव्हेंबर रोजी आयोजित जिल्हा साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. मात्र, पारितोषिक वितरण समारंभाला उपस्थित असलेल्या स्पर्धकांनाच पारितोषिके दिली जातील. सर्व बक्षिसे आणि सहभाग प्रमाणपत्रांचे वितरण जिल्हा साहित्य संमेलनात करण्यात येणार आहे.
स्पर्धेसाठी नावनोंदणी करण्याची अंतिम तारीख १६ ऑक्टोबर २०२६ आहे. अभिवाचनासाठी पुस्तके उपलब्ध नसल्यास स्पर्धकांनी साने गुरुजी वाचन मंदिर, धुरीवाडा, मालवण येथे संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
वाचनप्रेमी, साहित्यप्रेमी आणि विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी होऊन वाचन संस्कृतीच्या संवर्धनासाठी योगदान द्यावे, असे आवाहन साने गुरुजी वाचन मंदिराच्या वतीने करण्यात आले आहे.