मालवण : कुडाळ-मालवणच्या राजकारणात ‘वैभव नाईक’ हा फॅक्टर कायम

शेअर करा

राधिका मोंडकर यांचे मालवण न. प. सत्ताधाऱ्यांना प्रत्युत्तर

मालवण,दि.१५ ऑगस्ट

मालवण शहरातील प्रलंबित कामे, समस्या आणि नगरपालिकेच्या कारभारा विरोधात उबाठा नगरसेवकांनी सत्ताधारी तसेच प्रशासनाविरोधात आवाज उठवल्यावर तसेच या अनुषंगाने नगरसेवक तपस्वी मयेकर यांनी छेडलेल्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेतील सत्ताधारी शिंदे शिवसेनेच्या लोकप्रतिनिधीनी दिलेल्या प्रत्युत्तरात माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर जोरदार टीका व आरोप केली. मात्र या आरोपांना उबाठा शिवसेनेच्या महिला शहर संघटक राधिका मोंडकर यांनी प्रत्युत्तर दिले असून निवडणुकीत पराभव झाला, पद गेलं, राजकीय समीकरणं बदलली; पण कुडाळ-मालवणच्या राजकारणात ‘वैभव नाईक’ हा फॅक्टर कायम आहे, सध्याच्या नगरपालिका सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारल्यावर वैभव नाईक यांच्या गतकाळाचा आधार घ्यावा लागत असेल तर पुन्हा वैभव नाईकच जिंकलेत असा संदेश स्पष्टपणे जातोय असे सौ. मोंडकर यांनी म्हटले आहे.

याबाबत सौ. राधिका मोंडकर यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात त्यांनी म्हटले आहे की, निवडणुकीतील पराभवानंतर त्याची संपूर्ण जबाबदारी स्वीकारत वैभव नाईक यांनी स्वतःला ‘माजी आमदार’ सुद्धा म्हणू नका, अशी भूमिका घेतली होती. मात्र, राजकारणात पद बदलले म्हणून एखाद्या नेत्याचा जनसंपर्क, कार्यपद्धती आणि राजकीय प्रभाव एका दिवसात संपत नाही. कुडाळ-मालवणमध्ये गेल्या ११ वर्षांच्या त्यांच्या राजकीय प्रवासाकडे पाहिल्यास ही बाब प्रकर्षाने जाणवते.

वैभव नाईक यांच्या आमदारकीच्या काळात परिस्थिती नेहमीच अनुकूल होती असे नाही. पहिल्या टप्प्यात केंद्र-राज्य समन्वयाचा अभाव, तर दुसऱ्या टप्प्यात कोरोनासह नैसर्गिक आपत्तींचे संकट अशा अनेक आव्हानांचा सामना त्यांच्या कार्यकाळाला करावा लागला. मात्र, या अडचणींचे कारण पुढे करत त्यांनी काम थांबवले नाही. कोरोनापूर्वी प्रस्तावित आणि मंजूर झालेली कामे असोत, कोरोना काळात नागरिकांच्या वैयक्तिक अडचणी असोत किंवा प्रशासनाकडून अत्यावश्यक सेवा सुरळीत ठेवण्याचा प्रश्न असो, ‘ग्राऊंडवरचा आमदार’ ही प्रतिमा त्यांनी जपली.

कोरोनाच्या काळात सर्वसामान्यांच्या हालचालींवर निर्बंध असताना कुडाळ-मालवणमध्ये सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि आरोग्यविषयक उपक्रमांची धग कायम ठेवण्याचा प्रयत्न झाला. त्याच काळात अनेक युवा कार्यकर्ते राजकारणात पुढे आले. त्यातील काही जण आज वेगवेगळ्या राजकीय पक्षांत पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि नेते म्हणून कार्यरत आहेत.

कोरोनाचे सावट पूर्णपणे दूर झालेले नसताना आणि पावसाची मोठी शक्यता असतानाही आयोजित करण्यात आलेला ‘दांडी पर्यटन व सांस्कृतिक महोत्सव २०२२’ हा त्या काळातील वेगळा प्रयोग ठरला. स्थानिक पर्यटनाला चालना देण्याबरोबरच छोटे व्यावसायिक, कलावंत आणि होतकरू युवकांना व्यासपीठ मिळावे, हा त्यामागचा उद्देश होता. राजकारणापलीकडे स्थानिक अर्थव्यवस्था आणि सांस्कृतिक क्षेत्राला बळ देण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

मालवण शहरातील मच्छी मार्केट, भाजी मार्केट, कचरा व्यवस्थापन, तुंबलेल्या गटारांचे प्रश्न, नूतन बंदर जेटी, किल्ले सिंधुदुर्गवरील सिंहासन अशा स्थानिक विषयांवर प्रशासनाला जाब विचारण्याची त्यांची शैली कायम चर्चेत राहिली. अनेकदा दुचाकीवरून शहरातील प्रश्नांच्या ठिकाणी पोहोचणारा आमदार अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली. तौक्ते चक्रीवादळानंतरच्या परिस्थितीतही ते स्वतः रस्त्यावर उतरले. नेत्याच्या दौऱ्यापेक्षा नागरिकांच्या अडचणीच्या ठिकाणी प्रत्यक्ष पोहोचण्याला त्यांनी प्राधान्य दिले.

राजकारणात काळ बदलतो, पक्ष बदलतात, चेहरे बदलतात. कालपर्यंत वैभव नाईक यांच्या सोबत असलेले काही कार्यकर्ते आज वेगवेगळ्या राजकीय पक्षांत आहेत. राजकीय समीकरणांनुसार भूमिका बदलणे हा राजकारणाचा भाग असला तरी, आजच्या राजकीय टीकेमध्येही गतकाळातील वैभव नाईक यांच्या कार्याचा संदर्भ वारंवार येत असेल, तर त्यातून एक वेगळाच राजकीय संदेश जातो. सत्ताधाऱ्यांना आजच्या प्रश्नांची उत्तरे देताना जर वारंवार कालच्या कारभाराचा दाखला द्यावा लागत असेल, तर जनतेच्या चर्चेचा केंद्रबिंदू अजूनही कोण आहे, हा प्रश्न उपस्थित होतो.

कुत्र्यांचे निर्बिजीकरण, कचरा व्यवस्थापनाचे तांत्रिक सक्षमीकरण, व्यापाऱ्यांच्या सहभागातून अग्निशमन वाहनांचे उद्घाटन, बीच क्लिनिंग मशीन व्हेईकल, मामा वरेरकर नाट्यगृह दुरुस्तीचा आराखडा, आडारी-धुरीवाडा सुशोभीकरण अशा विविध विषयांचा त्यांच्या कार्यकाळाशी संबंध जोडला जातो. विधानसभेत तारांकित प्रश्नांच्या माध्यमातून स्थानिक प्रश्न मांडण्याची त्यांची शैलीही प्रभावी ठरली. विशेष म्हणजे, कोणताही मोठा राजकीय वरदहस्त नसतानाही सभागृहात स्थानिक प्रश्न सातत्याने मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

निवडणुकीचा निकाल वैभव नाईकांच्या विरोधात गेला असेल, पण राजकीय चर्चेतील त्यांची उपस्थिती संपलेली नाही, हे मात्र या सगळ्या चित्रातून स्पष्ट होताना दिसते. म्हणूनच कुडाळ-मालवणच्या राजकारणात आज एकच प्रश्न पुन्हा पुन्हा ऐकू येतोय, ‘पराभव निवडणुकीत झाला… पण वैभव नाईकांचा राजकीय प्रभाव खरोखर संपला आहे का?’ असा सवाल राधिका मोंडकर यांनी केला आहे.

शेअर करा