शैक्षणिक वर्षाच्या तोंडावर हजारो नागरिक अन् विद्यार्थी अडचणीत, महायुती सरकारचे दुर्लक्ष
सावंतवाडी ,दि.१० जुलै
“सरकारी काम आणि सहा महिने थांब” या जुन्या म्हणीचा प्रत्यय सध्या राज्यातील जनतेला महायुती सरकारच्या कारभारामुळे पुन्हा एकदा येत आहे. महायुती सरकारने मोठा गाजावाजा करत महासेवा केंद्रांच्या माध्यमातून ‘आपलं सरकार’ हे पोर्टल सुरू केले खरे, मात्र गेल्या दोन महिन्यांहून अधिक कालावधीपासून ही वेबसाईट पूर्णपणे बंद असल्याने राज्यातील हजारो नागरिक आणि विद्यार्थ्यांचे महत्त्वाचे दाखले रखडले आहेत. सद्यस्थितीमध्ये या वेबसाईटवर लॉगिन करण्याचा प्रयत्न केल्यास ‘लोकल होस्ट’ (Localhost) अशा प्रकारचा एरर येत असून, दोन महिने उलटूनही प्रशासनाला हा तांत्रिक बिघाड दुरुस्त करता आलेला नाही, ही अत्यंत गंभीर बाब समोर आली आहे.
सध्या नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून शाळा-महाविद्यालयांमधील प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांची तातडीने आवश्यकता आहे. ‘आपलं सरकार’ पोर्टलवरून सामान्यतः उत्पन्नाचे दाखले, जातीचे दाखले, अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाइल) यांसह अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे ‘गॅझेट’ (राजपत्र) यासाठीचे अर्ज केले जातात. नाव बदलणे किंवा दुरुस्तीसाठी गॅझेट अत्यंत उपयुक्त ठरते. मात्र, वेबसाईट बंद असल्यामुळे गॅझेटसह शॉप ॲक्ट लायसन्स, ध्वनिक्षेपक (स्पीकर) परवानगी अशा अनेक आवश्यक सेवा खोळंबल्या आहेत. परिणामी, शासकीय कार्यालये आणि महासेवा केंद्रांचे उंबरठे झिजवूनही नागरिकांच्या हाती काहीच लागत नसल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे, शासनाने नुकतेच राज्याचे पावसाळी अधिवेशन पार पाडले. या अधिवेशनात अनेक विषयांवर चर्चा झाली, मात्र जनतेशी थेट निगडित असलेली आणि दोन महिन्यांपासून बंद पडलेली ‘आपलं सरकार’ वेबसाईट सुरू करण्यास सरकार पूर्णपणे विसरले की काय, असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे. एकीकडे डिजिटल इंडिया आणि गतिमान प्रशासनाचा गवगवा केला जात असताना, दुसरीकडे दोन महिने तांत्रिक एरर दूर होऊ नये, यावरून सरकारचा ढिसाळ कारभार उघड झाला आहे. शैक्षणिक प्रवेशाची मुदत संपत आल्याने विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले असून, महायुती सरकारने या तांत्रिक बिघाडाची गंभीर दखल घेऊन ‘आपलं सरकार’ पोर्टल तातडीने पूर्ववत सुरू करावे, अशी जोरदार मागणी आता सर्व स्तरातून केली जात आहे.