श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टचा उपक्रम; नागरिक व भाविकांनी रक्तदान करण्याचे आवाहन
देवगड,दि.१ सप्टेंबर
रक्तदान हेच श्रेष्ठदान या उदात्त विचाराने प्रेरित होऊन देवगड तालुक्यातील समस्त नागरिकांना आणि श्री देव कुणकेश्वरच्या भक्तांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट, कुणकेश्वर यांच्या विद्यमाने कुणकेश्वर देवाच्या पवित्र भूमीत प्रथमच एका भव्य ‘विक्रम’ महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
कुणकेश्वर देवाच्या सानिध्यात पार पडणारे हे महाअभियान आजवरचे सर्व विक्रम मोडीत काढून गरजूंना जीवनदान देईल, असा विश्वास आयोजकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. सिंधुदुर्ग आणि देवगड तालुक्यातील गरजू रुग्णांच्या मदतीसाठी सज्ज असणाऱ्या ‘सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान’ सिंधुदुर्ग शाखा देवगडच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शिबिराची सविस्तर माहिती:
* दिनांक: सोमवार, ०७ सप्टेंबर २०२६ (चौथा श्रावणी सोमवार)
* वेळ: सकाळी ०९:०० ते दुपारी ०१:०० वाजेपर्यंत
* स्थळ: भक्तनिवास दर्शन मंडप, श्री देव कुणकेश्वर मंदिर परिसर, कुणकेश्वर
श्रावणी सोन्यासारख्या पवित्र दिवशी आणि देवाच्या सेवेचा योग साधून सिंधुदुर्ग व देवगड तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी, रक्तदात्यांनी व भाविकांनी या महा-रक्तदान उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपले अमूल्य रक्तदान करावे आणि या शिबिराला ऐतिहासिक यश मिळवून द्यावे, असे नम्र आवाहन सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग शाखा देवगडच्या अध्यक्षांनी व सचिवांनी केले आहे.
“श्री कुणकेश्वरराच्या कृपेने सेवेतूनच खरी पूजा करूया” हा संदेश देत या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.