‘गजेंद्रमोक्ष’ चलचित्र देखावा ठरला आकर्षण
मालवण,दि.०२ नोव्हेंबर
मालवण भरड येथील श्री दत्त मंदिरातील सार्वजनिक गणेशोत्सव विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होऊन शनिवारी गणेश विसर्जन मिरवणुकीने या उत्सवाची सांगता झाली. या विसर्जन मिरवणुकीत श्री दत्त मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे सादर झालेल्या ‘गजेंद्रमोक्ष’ हा चलचित्र देखावा सर्वांचे आकर्षण ठरला.

मालवण भरड येथील श्री दत्त मंदिरात दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा होतो. यावर्षीही १४ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीला श्री गणेश मूर्ती मंदिरात विराजमान झाली होती. या गणेशोत्सवानिमित्त श्री दत्त मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे विविध धार्मिक, अध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले. यामध्ये विविध मंडळांची भजने, सुगम संगीत, कीर्तने, दशावतार नाट्यप्रयोग असे विविध कार्यक्रम संपन्न झाले. तसेच सत्यनारायण महापूजेचेही आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ‘उत्तरचंद्राची कोजागिरी’ हा अभिवाचन कार्यक्रम, कीर्तन पंचक, अष्टपैलू कलानिकेतनचा सुगम संगीत आदी कार्यक्रम लक्षवेधी ठरले.

शनिवारी ३१ ऑक्टोबर रोजी या सार्वजनिक गणेशोत्सवाची सांगता झाली. सायंकाळी ढोल ताशांच्या गजरात श्री गणेश मूर्तीची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मंडळातर्फे ‘गजेंद्रमोक्ष’ हा पौराणिक कथेवर आधारित चलचित्र देखावा सादर करण्यात आला. कलाकारांचा अभिनय, कल्पकतेने दाखविलेले ट्रिकसिन, आधुनिक यंत्रांचा वापर आणि नृत्यविष्कार यांची उत्तम सांगड घालत सादर झालेल्या या चलचित्र देखाव्याने सर्वांची वाहवा मिळवली.
या चलचित्र देखाव्याची संकल्पना श्री दत्त मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची होती तर संहिता लेखन व निवेदन – महेश धामापूरकर यांनी केले. तसेच निर्मिती सुमुख आर्ट्स (नंदू फणसेकर), विवेक देऊलकर, पार्थ मेस्त्री, प्रमोद मेस्त्री, सर्वेश परुळेकर, संजू परुळेकर, तुषार मेस्त्री यांनी केली. प्रकाश योजना – सचिन आरोलकर, सुयोग ढोलम, बबन मयेकर, तंत्रसहाय्य – पराग परब, समीर वायंगणकर, अण्णा माणगावकर, जान्हवी परुळेकर, जितेश वेर्लेकर, ध्वनी – श्री दत्तराज साउंड (बाळा आचरेकर), अभय कदम, फायरवर्क – सिद्धार्थ परब, कौस्तुभ गावकर, पात्र – श्री विष्णू – प्रवीण पराडकर, गजेंद्र/ इंद्रधुम्न – संतोष मंडलिक, मगर/गंधर्व – प्रथमेश सामंत, नृत्य कलाकार – चेतन हडकर, सागर रेडकर, सिद्धेश पालव, प्रथमेश चव्हाण, यशश्री वरक, स्वरूपा मयेकर, पंकजा मालवणकर, काव्या सरकारे यांचे सहकार्य लाभले.