Malvan News:विरोध करणे हे विरोधकांचे कामच ; मात्र मालवणची जनता सुज्ञ

शेअर करा

नगरध्यक्षा सौ. ममता वराडकर यांचा विरोधकांना टोला

मालवण,दि.०१ नोव्हेंबर

मालवण बंदर जेटी येथील स्वच्छता गृहाची दुरावस्था विरोधक ठाकरे शिवसेनेच्या महिला आघाडीने समोर आणत मालवण नगरपालिकेच्या कारभारावर टीका केल्यावर मालवणच्या नगरध्यक्षा ममता वराडकर यांनी पत्रकार परिषदेतून विरोधकांना उत्तर दिले आहे. आठ दिवसापूर्वीच मालवण नगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत स्वच्छता गृहांच्या डागडुजीबाबत चर्चा करण्यात आली असून बंदर जेटी येथील स्वच्छता गृहाची सध्या तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी करण्यात येणार आहे, तर येत्या काळात मालवणात सुसज्ज आणि वातानुकुलीत स्वच्छतागृहे उभारण्याबाबत आमदार निलेश राणे यांच्याशी सकारात्मक चर्चा केली आहे, असे नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी सांगत विरोध करणे हे विरोधकांचे कामच आहे, मात्र मालवणची जनता सुज्ञ आहे, असा टोला विरोधकांना लगावला आहे.

मालवण येथील शिंदे शिवसेना कार्यालयात मालवण नगरपालिकेतील सत्ताधारी शिंदे शिवसेनेच्या नगरसेवकांनी पत्रकार परिषद झाली. त्यावेळी नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर बोलत होत्या. यावेळी उपनगरध्यक्ष दीपक पाटकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, आरोग्य सभापती पूनम चव्हाण, नगरसेवक महेश कोयंडे, महेश कांदळगावकर, नगरसेविका मेघा सावंत, नीना मुंबरकर, अश्विनी कांदळकर, शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे, शहरप्रमुख राजु बिडये, मोहन वराडकर, रोहन आचरेकर आदी उपस्थित होते.

यावेळी नगराध्यक्षा ममता वराडकर म्हणाल्या, आठ दिवसापूर्वी मालवण नगरपालिकेच्या स्थायी समितीची बैठक झाली. यां बैठकीत मालवण मधील स्वच्छता गृहे डागडुजी बाबत चर्चा करण्यात आली. सध्या पर्यटन हंगाम चालू असल्याने मालवण बंदर जेटी येथील स्वच्छता गृहाची तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्ती करण्यात येणार आहे. तेथील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी जवळच असलेल्या बंदर विभाग कार्यालयाच्या परिसरात बोअरवेल बांधण्यात येणार आहे. तसेच केवळ मालवण बंदर जेटीच नव्हे तर चिवला बीच, दांडी याठिकाणी देखील सुसज्ज आणि वातानुकुलीत स्वच्छता गृहे उभारण्याचा आमचा प्रयत्न असून याबाबत आमदार निलेश राणे यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन आम. राणे यांनी दिले आहे, असेही सौ. वराडकर म्हणाल्या.

कोणतेही काम आज केले आणि उद्या झाले असे होत नाही. प्रत्येक विकासकामास काही नियम असतात, कार्यालयीन बाबी पूर्ण करण्यास वेळ लागतो. विरोध करणे हे विरोधकांचे कामच आहे. विरोधक गैसरसमज पसरविण्याचे काम करत आहेत. मात्र, विरोधकांच्या विरोधाशी आम्हाला काही घेणे देणे नाही. आमदार निलेश राणे व आम्हा नगरसेवकांना जनतेने विश्वासाने निवडून दिले आहे. त्यामुळे जनता सुज्ञ आहे. मालवण शहर स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी आम्ही सर्व एकत्रितपणे काम करत आहोत, असेही सौ. वराडकर यांनी सांगितले.

शेअर करा