पर्यावरणपूरक सजावटीसह सामाजिक संदेश देण्याचे आवाहन; तीन गटांत होणार स्पर्धा, आकर्षक पारितोषिके
तळेरे ,दि.०१ नोव्हेंबर
दिवाळीचा आनंद सर्जनशीलतेतून आणि सामाजिक जाणीवेतून साजरा करण्याच्या उद्देशाने तळेरे येथे ७ नोव्हेंबर रोजी ‘आकाश कंदील’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दिविजा आश्रम, असलदे, स्व. सुनील तळेकर वाचनालय, तळेरे आणि डॉ. अनिल नेरुरकर (एम.डी., अमेरिका) प्रेरित सिंधू फाउंडेशन, तळेरे यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा होणार आहे. शनिवारी सकाळी १० वाजता श्रावणी कॉम्प्युटर, तळेरे येथे स्पर्धेला सुरुवात होईल.
‘चला, ही दिवाळी करूया सेवेची आणि सृजनाची!’ या संकल्पनेतून आयोजित स्पर्धेत इयत्ता पहिली ते चौथी, इयत्ता पाचवी ते दहावी आणि खुला गट असे तीन गट करण्यात आले आहेत. पहिली ते चौथीच्या गटासाठी एक फूट, तर उर्वरित दोन्ही गटांसाठी दीड फूट आकाराचा आकाश कंदील तयार करणे आवश्यक आहे.
विजेत्यांना रोख पारितोषिके व प्रमाणपत्र :-
पहिली ते चौथी गटात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे ४००, ३०० आणि २०० रुपये, पाचवी ते दहावी गटात ५००, ३०० आणि २०० रुपये, तर खुल्या गटात ७००, ५०० आणि ३०० रुपये अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. विजेत्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. सहभागी सर्व स्पर्धकांना ई-प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
पर्यावरणपूरक कंदिलातून सामाजिक संदेश :-
स्पर्धकांनी स्वतः घरी तयार केलेला आकाश कंदील सादर करणे आवश्यक आहे. कंदील तयार करताना प्लास्टिक आणि थर्माकोलचा वापर टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कंदील पर्यावरणपूरक असण्यासोबतच त्यातून सामाजिक संदेशही दिला जाणे अपेक्षित आहे. व्यसनमुक्त समाज, स्वच्छ भारत, पाणी वाचवा, निसर्गाचे रक्षण आणि बालविवाह निर्मूलन यांसारख्या विषयांवर संदेश देता येणार आहेत. कंदिलामध्ये वात, वीज अथवा अन्य कृत्रिम उजेडाची व्यवस्था नसावी, अशी अट आहे.
स्पर्धेतील परीक्षकांचा निर्णय अंतिम राहणार आहे. या स्पर्धेत अधिकाधिक विद्यार्थ्यांनी, नागरिकांनी आणि कलाप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी सौ. श्रावणी मदभावे (७७१९८५८३८७), निकेत पावसकर (९४०३१२०१५६) आणि संदेश होळये (९२२३२१४१००) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.