Achra News : कानात कापूस, कीटक अडकण्यासह फंगल इन्फेक्शनच्या रुग्णांत वाढ

शेअर करा

आचरा आरोग्य केंद्राच्या डॉ. जुवेरिया मुजावर यांचे जनजागृतीपर आवाहन

आचरा,दि.०२ नोव्हेंबर
कानाची स्वच्छता करताना किंवा कानदुखीवर घरगुती उपचार करताना केलेले किरकोळ दुर्लक्ष गंभीर आरोग्य समस्येला कारणीभूत ठरू शकते. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत विविध वयोगटांतील रुग्ण कानातील वेदना, खाज, संसर्ग, फंगल इन्फेक्शन तसेच कानात अडकलेल्या बाह्य वस्तूंच्या समस्यांमुळे उपचारासाठी येत असल्याचे चित्र आहे. चुकीच्या पद्धतीने कानात तेल, औषधी ड्रॉप्स, कापूस किंवा कॉटन बड्स वापरण्यामुळे कानाच्या नाजूक भागांना इजा होण्याची तसेच संसर्ग वाढण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर आचरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. जुवेरिया मुजावर यांनी नागरिकांना कानाच्या आरोग्याबाबत विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
आचरा प्राथमिक आरोग्य केंद्रात कानाशी संबंधित काही विशेष रुग्णांवर उपचार करताना कानातून अडकलेला कापूस तसेच चक्क लहान कीटक बाहेर काढण्यात आले आहेत. कानात अडकलेली ही छोटी वस्तू किंवा कीटक रुग्णासाठी मोठ्या त्रासाचे कारण ठरू शकतात. कानात जिवंत कीटक शिरल्यास हालचालींमुळे वेदना, अस्वस्थता आणि कानाच्या आतील त्वचेला इजा होऊ शकते. तर कान स्वच्छ करताना कापूस किंवा कॉटन बड्सचा तुकडा आत अडकून राहिल्यास संसर्गाचा धोका वाढू शकतो. अशा वेळी स्वतःहून वस्तू काढण्याचा प्रयत्न केल्यास ती आणखी आत जाण्याची शक्यता असते. अनेक नागरिक कानात खाज सुटल्यास किंवा कान गच्च झाल्यास स्वतःच कान स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतात. यासाठी काडी, हेअरपिन, मॅचस्टिक, टोकदार वस्तू किंवा कॉटन बड्सचा वापर केला जातो. मात्र कानाच्या आतील त्वचा अत्यंत नाजूक असते. अशा वस्तूंच्या वापरामुळे त्वचेवर ओरखडे पडणे, रक्तस्राव होणे, सूज येणे किंवा कानाच्या पडद्याला इजा होण्याचा धोका असतो.
कानातील मळ हा नैसर्गिकरीत्या कानाचे संरक्षण करणारा घटक आहे. त्यामुळे वारंवार किंवा खोलवर कान स्वच्छ करण्याची गरज नसते. कानात तेल घालणे, कापूस ठेवणे किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय विविध प्रकारचे ड्रॉप्स वापरणे यामुळे काही वेळा कानातील ओलावा वाढून फंगल इन्फेक्शनसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. विशेषतः कानाच्या पडद्याला छिद्र असल्यास काही औषधे किंवा द्रव पदार्थ कानासाठी हानिकारक ठरू शकतात. कानात संसर्ग किंवा बाह्य वस्तू अडकल्यास विविध लक्षणे दिसून येऊ शकतात. कानात तीव्र किंवा ठणकणारी वेदना होणे, कान गच्च झाल्यासारखे वाटणे, आत काहीतरी फिरत असल्याची जाणीव होणे, गुणगुणल्यासारखा आवाज येणे, तीव्र खाज सुटणे, कानाच्या आतील भागात सूज किंवा लालसरपणा येणे ही त्यातील प्रमुख लक्षणे आहेत.
कानात कीटक शिरल्यास किंवा कापूस, कॉटन बड्सचा तुकडा अथवा अन्य वस्तू अडकल्याची शंका असल्यास त्वरित जवळच्या डॉक्टरांकडे किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात जावे. स्वतःहून टोकदार वस्तू वापरून ती काढण्याचा प्रयत्न करू नये. डॉक्टर कानाची योग्य तपासणी करून सुरक्षित पद्धतीने अडकलेली वस्तू बाहेर काढू शकतात.
कानात वेदना किंवा संसर्ग असल्यास डॉक्टरांच्या तपासणीनंतर आवश्यकतेनुसार औषधी इयर ड्रॉप्स, वेदना कमी करणारी औषधे किंवा अन्य उपचार दिले जातात. फंगल इन्फेक्शन असल्यास त्यासाठी स्वतंत्र उपचारांची आवश्यकता असते. त्यामुळे प्रत्येक कानदुखीवर एकच औषध किंवा घरगुती उपाय वापरणे योग्य नाही.
कानाच्या आरोग्यासाठी डॉ. जुवेरिया मुजावर यांचे आवाहन

कान हा शरीरातील अत्यंत नाजूक आणि महत्त्वाचा अवयव असून त्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. कानात तेल, ड्रॉप्स किंवा अन्य पदार्थ डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय टाकू नयेत. कॉटन बड्स किंवा टोकदार वस्तू कानाच्या आत खोलवर घालणे टाळावे. कानात काही अडकल्यास किंवा संसर्गाची लक्षणे जाणवल्यास त्वरित वैद्यकीय तपासणी करून घ्यावी.
कानाच्या समस्यांकडे किरकोळ त्रास म्हणून दुर्लक्ष केल्यास पुढे गंभीर गुंतागुंत निर्माण होऊ शकते. त्यामुळे लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी कानाच्या स्वच्छतेबाबत योग्य पद्धतींचा अवलंब करावा आणि चुकीच्या घरगुती उपचारांपासून दूर राहावे, असे आवाहन आचरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. जुवेरिया मुजावर यांनी केले आहे.

तुमच्या शंका आमचे उत्तर
.या बाबत कुणाला शंका असल्यास किंवा आपले आरोग्य विषयी प्रश्न असतील तर क्यूआरकोड स्कॅन करून त्यावर पाठविण्याचे आवाहन डॉ मुजावर यांनी केले आहे

शेअर करा