भारतीय बौद्ध महासभेच्या सिंधुदुर्ग जिल्हा व मालवण तालुका शाखेचा संयुक्त पुढाकार; डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनात प्रशिक्षण शिबिराचे आयोजन!
मालवण,दि.०२ नोव्हेंबर
भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा सिंधुदुर्ग, तालुका शाखा मालवण तसेच जिल्हा व तालुका महिला शाखेच्या संरक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले समता सैनिक दलाचे एकदिवसीय सैनिक प्रशिक्षण शिबिर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, कट्टा येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
शिबिराच्या अध्यक्षस्थानी जिल्हा संरक्षण विभागाचे उपाध्यक्ष दिलीप कदम होते. भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर यांच्या हस्ते समता सैनिक दलाचे ध्वजारोहण व दीपप्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. प्रारंभी महामानवांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून त्रिसरण व पंचशील ग्रहण करण्यात आले.
शिबिराचे प्रमुख प्रशिक्षक मेजर जनरल शरणपाल कदम यांनी सैनिकांची परेड घेऊन समता सैनिक दलाचे महत्त्व, दलाची शौर्यगाथा, सैनिकांची शिस्त, कर्तव्य आणि बौद्ध म्हणून आपले आचरण कसे असावे, याबाबत सखोल मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी सैनिकांना उत्कृष्ट पद्धतीने प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले. यावेळी जिल्हा सरचिटणीस संजय पेंडूरकर आणि जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर यांनी उपस्थित सैनिकांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.
शिबिरादरम्यान भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा सिंधुदुर्ग (मुंबई) चे जिल्हाध्यक्ष भिकाजी वर्देकर, जिल्हा महिला शाखेच्या सरचिटणीस आदरणीय अपूर्वा पवार, तालुका शाखेचे माजी प्रचार व पर्यटन उपाध्यक्ष अमित पवार तसेच कुडाळ तालुक्याचे माजी सरचिटणीस नाना नेरुरकर यांनी सदिच्छा भेट दिली.
समारोपप्रसंगी तालुकाध्यक्ष रविकांत कदम, मुंबईचे जिल्हाध्यक्ष भिकाजी वर्देकर आणि जिल्हा सरचिटणीस संजय पेंडूरकर यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच प्रशिक्षणार्थी वैभव कदम आणि मानसी काळसेकर यांनी प्रशिक्षणादरम्यान आलेले अनुभव व मनोगत व्यक्त केले.
या शिबिराला जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर, जिल्हा सरचिटणीस संजय पेंडूरकर, जिल्हा कोषाध्यक्ष शिवप्रसाद चौकेकर, जिल्हा महिला सरचिटणीस अपूर्वा पवार, जिल्हा संरक्षण विभागाचे उपाध्यक्ष दिलीप कदम, तालुकाध्यक्ष रविकांत कदम, सरचिटणीस नचिकेत पवार, सैनिक लीलाधर तळगावकर, जिल्हा महिला संस्कार उपाध्यक्ष स्नेहा पेंडूरकर, जिल्हा महिला संघटक लीना तळगावकर, जिल्हा संरक्षण सचिव गुणाजी जाधव, प्रवीण कदम तसेच लांजा येथील सैनिक रवींद्र जाधव यांच्यासह अनेक सैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन तालुका संरक्षण विभागाचे उपाध्यक्ष योगेश वराडकर यांनी केले. शिबिर यशस्वीतेसाठी तालुका शाखेचे कार्यालयीन सचिव शंकर कदम, हिशोब तपासणीस वैभव कदम, प्रचार व पर्यटन सचिव संदीप कदम, संस्कार सचिव सचिन कासले, संघटक भरत पेंडूरकर, भिवा तळगावकर, तालुका महिला संरक्षण सचिव मयुरी चेंदवणकर, संरक्षण सचिव अमोल तळगावकर, गणेश कासले, तालुका शाखेचे माजी कार्यालयीन सचिव मनोज काळसेकर यांनी परिश्रम घेतले.