अपरिहार्य कारणांमुळे निर्णय; समितीचे अध्यक्ष ॲड. प्रसाद करंदीकर यांची जाहीर निवेदनाद्वारे माहिती.
देवगड,दि.०२ नोव्हेंबर
महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या वतीने महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात बुधवार, ४ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेले निषेध आंदोलन काही अपरिहार्य कारणांमुळे तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. याबाबत समितीचे अध्यक्ष ॲड. प्रसाद करंदीकर यांनी जाहीर निवेदनाद्वारे माहिती दिली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे कर्जाच्या समस्येमुळे काही शेतकऱ्यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेची गंभीर दखल घेत संबंधित शेतकरी बांधवांना आधार देण्यासाठी तसेच त्यांच्या प्रश्नांवर पाठपुरावा करण्यासाठी महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या पदाधिकाऱ्यांना सांगोला व पंढरपूर येथे उपस्थित राहणे आवश्यक असल्याने महावितरणविरोधातील आंदोलन तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, हे आंदोलन पूर्णपणे रद्द करण्यात आलेले नसून, आंदोलनाची पुढील तारीख लवकरच स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
या आंदोलनासाठी पाठिंबा दर्शविणारे व्यापारी, शेतकरी, आंबा व्यापारी, विविध व्यापारी संघटना, व्यावसायिक, पर्यटन व्यावसायिक आणि नागरिकांचे महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या वतीने आभार मानण्यात आले आहेत. जनतेच्या हक्कांसाठी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी समिती यापुढेही ठामपणे लढा देणार असल्याचे ॲड. प्रसाद करंदीकर यांनी म्हटले आहे.