सायबर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; देवगड, पूर्णगड आणि बारसू येथील प्रस्तावित प्रकल्पांबाबत पुनर्विचार करण्याची मागणी
सावंतवाडी,दि.२३ जुलै
तामिळनाडूतील कन्याकुमारीजवळील कुडानकुलम अणुऊर्जा प्रकल्पाशी संबंधित कथित डेटा लीकच्या पार्श्वभूमीवर कोकणातील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असल्याचे मत अणुऊर्जा प्रकल्पविरोधी अभ्यासक डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी व्यक्त केले आहे.
डॉ. परुळेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देशात विविध पेपरफुटीच्या घटना चर्चेत असताना अणुऊर्जा प्रकल्पाशी संबंधित माहिती कथितरीत्या लीक झाल्याचे वृत्त अधिक गंभीर स्वरूपाचे आहे. अशा प्रकारच्या घटनांचा राष्ट्रीय सुरक्षेवर दूरगामी परिणाम होऊ शकतो. अणुऊर्जा प्रकल्पांसारख्या संवेदनशील ठिकाणांच्या सायबर सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले गेले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.
त्यांच्या म्हणण्यानुसार, कुडानकुलम अणुऊर्जा प्रकल्पाच्या देखभाल आणि काही तांत्रिक सेवांशी संबंधित यंत्रणेतून मोठ्या प्रमाणात डेटा लीक झाल्याचा दावा केला जात आहे. या घटनेमुळे भविष्यात सायबर हल्ले किंवा सुरक्षेशी संबंधित इतर धोक्यांची शक्यता नाकारता येत नसल्याने अशा घटनांची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
डॉ. परुळेकर यांनी पुढे सांगितले की, कोकणातील देवगड, पूर्णगड, बारसू तसेच इतर किनारी भागांमध्ये प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पांच्या अनुषंगाने सायबर सुरक्षेचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. भविष्यात अशा प्रकारचे सायबर हल्ले वाढल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे कोणताही अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यापूर्वी सायबर सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या सर्व बाबींचा सखोल अभ्यास करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जैतापूर येथे आधीच मोठ्या क्षमतेचा अणुऊर्जा प्रकल्प प्रस्तावित असताना कोकणात आणखी अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याच्या प्रस्तावांवर पुनर्विचार करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. पर्यावरण, स्थानिक नागरिकांची सुरक्षितता आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने या विषयाकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.