सावंतवाडीत आमसभेत लोकप्रश्नांवर घमासान; शक्तीपीठ महामार्ग, पाणी टंचाई अन् नाणोस पुलाच्या निकृष्ट कामावरून अधिकाऱ्यांची झाडाझडती

शेअर करा

सावंतवाडी,दि.१४ ऑगस्ट

सावंतवाडी पंचायत समितीच्या वतीने आयोजित आमसभेत शक्तीपीठ महामार्ग, नाणोस पुलाचे निकृष्ट काम, बांदा-पात्रादेवी रस्ता, भटक्या कुत्र्यांचा त्रास, पाणी टंचाई आणि डेटा सेंटर अशा विविध नागरी प्रश्नांवरून जोरदार घमासान पाहायला मिळाले. आमदार दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. यावेळी आमसभेत उपस्थित झालेल्या विविध समस्यांवर आमदार केसरकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरत तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
​यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, नगराध्यक्षा सौ. श्रद्धा सावंत-भोसले, शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, उपसभापती गौरव मुळीक, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब आदी मान्यवर व अधिकारी वर्ग उपस्थित होते.
​शक्तीपीठ महामार्गाचा ड्रोनद्वारे सर्व्हे करणार : आमदार केसरकर
​शक्तीपीठ महामार्गाच्या प्रस्तावित आराखड्यानुसार काम झाल्यास असनीये, डेगवे, तांबोळी, बांदा परिसरातील मोठी जैवविविधता नष्ट होईल आणि शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होईल, असा मुद्दा संदीप सावंत व गजानन गायतोंडे यांनी मांडला. त्यावर आमदार केसरकर यांनी स्पष्ट केले की, बांदा शहरासह शेतकऱ्यांच्या जमिनी धोक्यात येऊ दिल्या जाणार नाहीत. या महामार्गाचा ड्रोनद्वारे सर्व्हे करून प्रसंगी आराखडा बदलून देण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा केला जाईल.
​नाणोस पुलाचे काम अन् ठेकेदारावर कारवाईची मागणी:
​नाणोस येथील नव्याने बांधलेल्या पुलाला उद्घाटनापूर्वीच तडे गेल्याचा गंभीर प्रकार सागर नाणोसकर यांनी उघडकीस आणला. यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता पूजा इंगवले यांनी अधीक्षक अभियंत्यांनी पाहणी केली असून तांत्रिक समिती चौकशी करणार असल्याचे सांगितले. यावर उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी ‘अधिकारी ठेकेदाराला पाठीशी घालत आहेत’ असा थेट आरोप केला. आमदार केसरकर यांनी या प्रकरणी कार्यकारी अभियंत्यांना कडक चौकशी करून संबंधित ठेकेदार आणि निष्काळजी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले.
​सातार्डा ‘उत्तम स्टील’च्या जमिनीवर एमआयडीसी स्थापन करा:
​सातार्डा येथील ‘उत्तम स्टील’ प्रकल्प गेल्या २५ वर्षांपासून रखडला असून परिसरातील रस्ते सुरक्षित नाहीत. त्यामुळे कंपनीने जुना रस्ता दुरुस्त करून खुला करावा आणि दोन हजार एकर जागेवर प्रकल्प सुरू होत नसेल तर एमआयडीसीने ती जागा ताब्यात घेऊन नवीन उद्योग आणावेत, अशी मागणी उदय पारिपत्ये यांनी केली. यावर आमदार केसरकर यांनी, सदर जागा एमआयडीसीने ताब्यात घेण्यासाठी पत्र दिले असून प्रकल्प सुरू करण्याबाबत अथवा नवीन उद्योगासाठी निश्चित निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले.
​पाणी टंचाई अन् ‘जल जीवन’च्या कामांची चौकशी:
​कोलगाव, कुणकेरी, आंबोली, मळगाव या भागातील पाणी टंचाईवरून ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली. कुणकेरीच्या सरपंच सोनिया सावंत आणि प्रमोद सावंत यांनी ८० हजार लिटरची टाकी असूनही पाणी मिळत नसल्याचे सांगत ‘जल जीवन मिशन’च्या कामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कोट्यवधींचा निधी देऊनही कामे होत नसल्याने या सर्व कामांची चौकशी करण्यासाठी कमिटी नेमण्याचे निर्देश केसरकर यांनी दिले. तसेच तिलारी योजनेचे पाणी तळवडे, वेत्ये भागात पोहचवण्यासाठी गती देण्याचे उपसभापती गौरव मुळीक यांनी सांगितले.
​जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोझा यांनी कोलगाव ला नगरपरिषदेकडून पाणी पुरवठा होत नसेल तर पाईप लाईन टाकू देणार नाही असा इशारा दिला.
​बांदा फ्लायओव्हर व टोल नाका: बांदा येथील उड्डाणपुलाखालील पार्किंग आणि २५ एकर जमीन संपादनावरून साईनाथ कल्याणकर यांनी आक्षेप घेतला. यावर तोडगा काढण्याचे आश्वासन मिळाले.
​अड्याळी डेटा सेंटर: २२०0 कोटींच्या डेटा सेंटर प्रकल्पाबाबत तेजल परब यांनी विचारणा केली असता, दुसरी कंपनी लवकरच येथे गुंतवणूक करेल, अशी माहिती केसरकर यांनी दिली.
​भटक्या कुत्र्यांचा त्रास: निशांत तोरसकर यांनी उपस्थित केलेल्या भटक्या कुत्र्यांच्या समस्येची नगराध्यक्षांनी दखल घेतली असून पेट ॲम्बुलन्स आणि शेल्टर होमबाबत प्रस्ताव करण्याचे ठरले.
​नाणोस-आजगाव मायनिंग: ” लोकांना नको असेल तर मी लोकांच्या पाठीशी असून कोणत्याही परिस्थितीत मायनिंग होऊ देणार नाही,” असा ठाम विश्वास आमदार केसरकर यांनी व्यक्त केला.
​गेल्या पाच महिन्यांत सर्वसमावेशक आमसभा आयोजित केल्याबद्दल पंचायत समिती प्रशासन, सभापती व गटविकास अधिकारी (BDO) यांचा अभिनंदनाचा ठराव प्रसंगी संमत करण्यात आला.

शेअर करा