सावंतवाडी,दि.२३ ऑगस्ट
मुंबई-गोवा महामार्गावरील झाराप-पत्रादेवी टप्प्यावर नेमळे गावच्या हद्दीत कुंभारवाडी येथे महामार्गाच्या मधोमध तब्बल एक फूट आकाराचा मोठा खड्डा पडला आहे. गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर पडलेल्या या धोकादायक खड्ड्यामुळे दुचाकीस्वारांच्या अपघातांचे प्रमाण वाढले असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत.
वारंवार घडणाऱ्या अपघातांमुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांमधून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. दररोज अपघात होऊन नागरिक जखमी होत असताना किंवा त्यांचा जीव धोक्यात सापडलेला असतानाही राष्ट्रीय महामार्ग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक व वाहनधारकांनी केला आहे.
सदर खड्डा तातडीने बुजवून संभाव्य जीवघेणे अपघात टाळावेत, अशी जोरदार मागणी वाहनधारकांकडून केली जात आहे. जर प्रशासनाने या समस्येकडे त्वरित लक्ष दिले नाही, तर मोठ्या आंदोलनाला सामोरे जावे लागेल असा इशाराही संतप्त प्रवाशांनी दिला आहे.