सावंतवाडी ,दि.२२ ऑगस्ट
येत्या काही काळात कोकण विभागात सुमारे पंचवीस हजाराहून जास्त शिक्षकांच्या रिकाम्या जागा भरावयाच्या आहेत.या अनुषंगाने महाराष्ट्र विधानपरिषदेचे आमदार आणि कोकणचे सुपूञ श्री प्रमोद जठार यानी ही भरती स्थानिकांतूनच झाली पाहिजे ही केलेली आग्रही मागणी स्वागतार्ह आहे.
मुळात कोकणात रोजगारांच्या संधी कमी.त्यामुळे कोकणातील बेरोजगार युवक- युवती तुटपुंज्या पगारावर काम करण्यासाठी शहराकडे स्थलांतर करतात.स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करू अशा घोषणा कोकणातील सगळेच नेते करत असतात.रिव्हर्स मायग्रेशन थांबले पाहिजे यासाठी गेले काही महिने सिंधुदुर्गचे पालकमंञी प्रयत्न करत आहेत हा येथील बेरोजगारांसाठी एक आशेचा किरण आहे.
तरीसुध्दा शिक्षक भरती करतानां कोकणातील बेरोजगार असलेल्या डि.एड.बी एड.पाञ उमेदवारांचाच प्राधान्याने विचार होणे आवश्यक आहे.स्थानिकांचा तो अधिकार असताना त्याना डावलून बाहेरील भरती केली जाते.हा अन्याय असून याला आमदार जठार यानी जाहीरपणे वाचा फोडली आहे.
स्थानिकांची यामुळे वर्षानुवर्ष उपेक्षाच होते.जे बाहेरचे शिक्षक लादले जातात ते काही वर्षांनंतर आपल्या भागात बदली करून जातात,परिणामी पुन्हा शाळांमधील शिक्षकांच्या जागा रिक्त होतात आणि शिक्षणाचा खेळखंडोबा होतो.
कोकणातील स्थानिक भाषा,संस्कृती,भौगोलिक परिस्थिती आणि विद्यार्थ्यांच्या मानसिकते बाबत स्थानिक शिक्षक सकारात्मक विचार करून आनंदाने आपले विद्यादानाचे कार्य करू शकतात.
आमदार जठार यानी केलेली मागणी स्तुत्य व स्वागतार्ह असून शासनाने याचा गांभीर्यपूर्वक विचार करणे गरजेचे आहे.