सावंतवाडी : फणसवडेतील शेतकऱ्यांसाठी संजू परब धावले; नुकसानभरपाई व पीक विम्याची मागणी

शेअर करा

सावंतवाडी,दि.१० जुलै

सततच्या पावसामुळे फणसवडे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, नुकसानभरपाई व पीक विम्याचा लाभ तातडीने मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्याकडे केली.

यावेळी शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडताना, “लवकरात लवकर नुकसानभरपाई व पीक विम्याची रक्कम मिळाली नाही, तर आम्हाला १५ ऑगस्ट रोजी उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागेल,” असा इशारा दिला.

शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्यानंतर संजू परब यांनी त्यांना दिलासा देत, “या प्रश्नासंदर्भात आपण तहसीलदारांची तातडीने भेट घेऊन प्रशासनाचे लक्ष वेधू. तरीही प्रश्न मार्गी लागला नाही, तर स्थानिक आमदार दीपक केसरकर तसेच आमदार निलेश राणे यांचेही लक्ष वेधून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई व पीक विम्याचा लाभ तातडीने मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करू,” असे आश्वासन दिले.

शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी तात्काळ गावात भेट दिल्याबद्दल ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी संजू परब यांचा सत्कार करून आभार व्यक्त केले.

यावेळी चंद्रकांत गावडे, रामकृष्ण गावडे, प्रभाकर गावडे, विठ्ठल गावडे, शेखर गावडे, आनंद गावडे, प्रकाश गावडे, विलास गावडे, सचिन गावडे आदी फणसवडे गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

शेअर करा