‘बहिणीला ओवाळणी म्हणून द्या निर्व्यसनी जीवनाची हमी’
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे आवाहन; प्रशासन, पत्रकारिता, मानवाधिकार व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसोबत रक्षाबंधनातून व्यसनमुक्तीचा संदेश
सिंधुदुर्ग,दि.२९ ऑगस्ट
रक्षाबंधनाच्या पवित्र सणाला सामाजिक बांधिलकी, व्यसनमुक्ती आणि पर्यावरण संवर्धनाची जोड देत सिंधु फाउंडेशनच्या वतीने गेल्या १६ वर्षांपासून सातत्याने राबविण्यात येत असलेल्या ‘एक राखी व्यसनमुक्तीची’ या उपक्रमाला यंदा ‘स्वच्छ पर्यावरणाची आणि सक्षम सिंधुदुर्गाची’ जोड देण्यात आली. या उपक्रमाचे यंदाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे चिमुकल्यांचा सक्रिय सहभाग. मेधांश मदभावे आणि स्पर्शिका मदभावे या चिमुकल्यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांना पर्यावरणपूरक राखी बांधली. तसेच ‘व्यसनमुक्त सिंधुदुर्ग’ या विषयावर कविता सादर करून उपस्थितांना व्यसनमुक्तीचा भावनिक संदेश दिला.

यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे यांनी बालचमूचे आणि या उपक्रमाचे विशेष कौतुक करत जिल्हावासीयांना महत्त्वपूर्ण संदेश दिला. त्या म्हणाल्या, “रक्षाबंधन हा केवळ भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा सण नाही, तर एकमेकांच्या सुरक्षिततेची आणि जबाबदारीची जाणीव करून देणारा दिवस आहे. सिंधु फाउंडेशनने गेल्या १६ वर्षांपासून रक्षाबंधनाच्या या सणाला व्यसनमुक्ती आणि पर्यावरण संवर्धनाशी जोडून सुरू ठेवलेला उपक्रम निश्चितच स्तुत्य आहे. आज पहिल्यांदाच अशा सामाजिक संदेशाने भरलेली पर्यावरणपूरक राखी हातात बांधली गेल्याचा मला विशेष आनंद आहे.”

त्या पुढे म्हणाल्या, “यंदाच्या रक्षाबंधनापासून प्रत्येक बहिणीच्या वतीने आपल्या भावाकडून निर्व्यसनी राहण्याची अनमोल ओवाळणी द्यावी. हा संकल्प प्रत्येक भावाने घेतला, तर तो केवळ एका कुटुंबाचे नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्याचे आरोग्य आणि भवितव्य सुरक्षित करणारा ठरेल. सर्वांनी मिळून व्यसनमुक्त, निरोगी आणि सक्षम सिंधुदुर्ग घडवूया.”
सिंधु फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रावणी मदभावे आणि सतीश मदभावे यांनी यावेळी गेल्या १६ वर्षांच्या सामाजिक कार्याचा तसेच ‘एक राखी व्यसनमुक्तीची’ या उपक्रमाच्या वाटचालीचा आढावा मांडला. या संपूर्ण सामाजिक चळवळीला डॉ. अनिल नेरुरकर यांचे मार्गदर्शन आणि महत्त्वपूर्ण योगदान लाभले आहे.
यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील श्री. मनोज भोगटे, श्री. संदिप शिंदे तसेच कार्यालयातील कर्मचारीवर्गालाही राख्या बांधून त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

त्यानंतर ओरोस येथील पत्रकार भवनात पत्रकारांसोबत रक्षाबंधन साजरे करण्यात आले. व्यसनाधीनतेची दाहकता प्रसारमाध्यमांतून समाजासमोर यावी आणि व्यसनमुक्तीसाठी जनजागृतीला बळ मिळावे, तसेच सिंधु फाउंडेशनच्या उपक्रमांना सातत्याने प्रोत्साहन दिल्याबद्दल कृतज्ञता म्हणून पत्रकारांना राखी बांधण्यात आली.
तहसीलदारांकडून चिमुकल्यांचे कौतुक
जिल्हाधिकारी कार्यालयातील उपक्रमानंतर कणकवलीचे तहसीलदार सन्माननीय दीक्षांत देशपांडे यांच्यासोबतही रक्षाबंधन साजरे करण्यात आले. यावेळी त्यांनी सिंधु फाउंडेशनच्या उपक्रमाला मनःपूर्वक शुभेच्छा देत मेधांश आणि स्पर्शिका यांच्या कविता सादरीकरणाचे तसेच त्यांच्या सामाजिक जाणीवेचे विशेष कौतुक केले.
‘गेली दहा-पंधरा वर्षे तुमचे कार्य पाहत आहोत’
‘पुढारी’चे संपादक सन्माननीय गणेशजी जेठे यांच्या समवेतही रक्षाबंधनाचा हा सामाजिक उपक्रम साजरा करण्यात आला. यावेळी त्यांनी सिंधु फाउंडेशनच्या सातत्यपूर्ण सामाजिक कार्याचे कौतुक करत, “गेली दहा ते पंधरा वर्षे आम्ही तुमचे कार्य पाहत आहोत. समाजासाठी तुम्ही करत असलेले कार्य मोठे आहे,” अशा शब्दांत गौरवोद्गार काढले.
त्यांच्या या गौरवोद्गारांमुळे सिंधु फाउंडेशनच्या सातत्यपूर्ण सामाजिक कार्याला मिळालेली ही एक महत्त्वपूर्ण पोचपावती असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
१६ वर्षांच्या व्यसनमुक्तीच्या चळवळीला ‘लोकमत’चे सातत्यपूर्ण पाठबळ
‘लोकमत’चे संपादक सन्माननीय महेशजी सरनाईक यांच्यासोबतही यावेळी रक्षाबंधन साजरे करण्यात आले. ‘एक राखी व्यसनमुक्तीची’ हा उपक्रम सुरू झाल्यापासून गेली १६ वर्षे व्यसनमुक्तीच्या या सामाजिक चळवळीला महेश सरनाईक यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि भक्कम पाठबळ लाभले आहे.

याच १६ वर्षांच्या सातत्यपूर्ण सहकार्याबद्दल आणि व्यसनमुक्तीच्या चळवळीला दिलेल्या अमूल्य पाठबळाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महेश सरनाईक तसेच त्यांच्या कार्यालयातील सहकाऱ्यांना सिंधु फाउंडेशनच्या वतीने कृतज्ञतेची राखी बांधण्यात आली.
मानवाधिकार क्षेत्रातील मान्यवरांप्रती कृतज्ञता
मानवाधिकार संघटना, सिंधुदुर्गचे कोकण विभाग प्रमुख सन्माननीय श्री. संतोष नाईक सर तसेच मंगेश चव्हाण सर यांनाही रक्षाबंधन करून समाजाप्रती त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. प्रशासन, पत्रकारिता, मानवाधिकार आणि सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांना या उपक्रमाशी जोडत सामाजिक बांधिलकी, व्यसनमुक्ती आणि सकारात्मक समाजनिर्मितीचा संदेश अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न सिंधु फाउंडेशनने केला.
चिमुकल्यांच्या हातून साकारल्या ८५ पर्यावरणपूरक राख्या
या संपूर्ण उपक्रमासाठी पर्यावरणपूरक राख्या तयार करण्याची जबाबदारीही बालचमूने उत्साहाने पार पाडली. तळेरे येथील श्री क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी तसेच श्रावणी कंप्युटरच्या विद्यार्थ्यांनी नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून तब्बल ८५ राख्या तयार केल्या. या राख्यांच्या माध्यमातून व्यसनमुक्तीबरोबरच पर्यावरण संवर्धन आणि बालकांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला. सामाजिक उपक्रमांमध्ये बालकांचा सहभाग वाढवून त्यांच्यामध्ये सामाजिक जबाबदारीची भावना रुजविण्याचा हा अभिनव प्रयत्न ठरला.
राखीचा धागा जोडतोय व्यसनमुक्तीच्या संकल्पाशी
गेली १६ वर्षे सातत्याने सुरू असलेल्या ‘एक राखी व्यसनमुक्तीची’ या उपक्रमातून राखीचा धागा यंदा केवळ भाऊ-बहिणीच्या नात्यापुरता मर्यादित न राहता व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा, पर्यावरण संवर्धनाची जाणीव आणि सक्षम सिंधुदुर्गाच्या स्वप्नाशी जोडला गेला आहे.