सिंधुदुर्ग : दहा वर्षांपासून फरार असलेला आरोपी गोव्यातून ताब्यात

शेअर करा

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई; देवगड न्यायालयाच्या अजामीनपात्र वॉरंटची बजावणी

सिंधुदुर्ग,दि.२८ ऑगस्ट

देवगड येथील दिवाणी न्यायाधीश क-स्तर तथा न्यायदंडाधिकारी वर्ग-१ यांच्या न्यायालयातील नियमित फौजदारी खटल्यातील मागील सुमारे दहा वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गोव्यातून शिताफीने ताब्यात घेतले.

पंकज रवींद्र प्रभू (वय 42, मूळ रा. काळसे, ता. मालवण, सध्या रा. बावखनवाडा, पेडणे, उत्तर गोवा) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. संबंधित आरोपी मागील दहा वर्षांपासून आपले अस्तित्व लपवून वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध न्यायालयाकडून वेळोवेळी एन.बी.डब्ल्यू. (अजामीनपात्र वॉरंट) बजावणीसाठी स्थानिक पोलीस ठाण्याकडे वॉरंट पाठविण्यात आले होते. मात्र आरोपी पोलिसांना मिळून येत नव्हता.

न्यायालयाकडून पुनश्च अजामीनपात्र वॉरंट बजावणीसाठी हे प्रकरण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे पाठविण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीचा तसेच तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेत आरोपीचा शोध सुरू केला.

या तपासादरम्यान आरोपी मान्द्रेम पोलीस ठाणे हद्दीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने 27 ऑगस्ट 2026 रोजी सापळा रचून त्याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी त्याला देवगड पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.

ही कारवाई सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक मोहन दहिकर व अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार आणि पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हेडकॉन्स्टेबल विल्सन डिसोझा, बस्त्याव डिसोझा आणि आशिष जामदार यांनी सहभाग घेतला.

शेअर करा