Sindhudurg : शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी सिंधुदुर्गातील ३३६ शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध

शेअर करा

आधार प्रमाणीकरणासाठी FLRS पोर्टलवर यादी उपलब्ध; प्रक्रिया विनामूल्य

सिंधुदुर्ग,दि.१३ ऑक्टोंबर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत राज्यातील ३.५१ लाख पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी दि. १३ ऑक्टोबर २०२६ रोजी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३३६ शेतकऱ्यांचा समावेश असून, त्यांची यादी https://flrs.maharashtra.gov.in/ या पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील या ३३६ शेतकऱ्यांमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थांशी संबंधित २३ शेतकरी, तर राष्ट्रीयीकृत व ग्रामीण बँकांकडील ३१३ शेतकऱ्यांचा समावेश आहे. यापूर्वी दि. २४ जुलै २०२६ रोजी ३ हजार ६९७ आणि दि. १० सप्टेंबर २०२६ रोजी ७८३ शेतकऱ्यांची यादी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली होती. नव्याने प्रसिद्ध झालेल्या यादीसह आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण ४ हजार ८१६ शेतकऱ्यांची यादी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
संबंधित पात्र शेतकऱ्यांची यादी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थांची कार्यालये, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सिंधुदुर्ग यांचे कार्यालय तसेच तालुका सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था श्रेणी-१ यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे. या याद्या संबंधित विकास संस्था, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, संबंधित बँक शाखा, ग्रामपंचायत कार्यालय आणि तलाठी कार्यालय येथे प्रसिद्ध करण्याची कार्यवाही प्रशासनामार्फत सुरू आहे.
या योजनेअंतर्गत कर्जमुक्तीचा लाभ मिळविण्यासाठी यादीतील सर्व पात्र शेतकऱ्यांनी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र किंवा महा ई-सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. यासाठी आधार कार्ड, ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी, कर्ज खात्याचे पासबुक आणि बचत खात्याचे पासबुक सोबत आणणे आवश्यक आहे. आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य असून, कोणत्याही केंद्रावर यासाठी पैसे देऊ नयेत, असे आवाहन सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक प्रदीप मालगावे यांनी केले आहे.

शेअर करा