तळेरे : जनतेच्या हितासाठी आणि जनसामान्यांना सोयीसुविधा मिळण्यासाठी तळेरे तालुका झालाच पाहिजे

शेअर करा

जिल्हा परिषद महिला बालकल्याण सभापती सौ. अनुराधा नारकर

तळेरे तालुका निर्मिती महामेळाव्याला जनतेचा उत्स्फूर्तपणे मोठा प्रतिसाद

तळेरे,दि.२९ ऑगस्ट

जनतेच्या हितासाठी आणि जनसामान्यांना सोयीसुविधा मिळण्यासाठी तळेरे हे ठिकाण सर्व दृष्टीने सोईस्कर ठिकाण आहे. त्याचबरोबर कणकवली, वैभववाडी आणि देवगड अशा तीनही तालुक्यांना जोडणारे आणि राष्ट्रीय महामार्गावरील मध्यवर्ती ठिकाण असलेले तळेरे हा तालुका झालाच पाहिजे आणि होणारच हे आजच्या उपस्थिती वरुन दिसून येते. ही जनतेची मागणी आहे आणि या चळवळीला आज मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादावरून दिसून येते. आपल्या या यशस्वी लढ्याला लवकरच यश मिळेल, असे प्रतिपादन जिल्हा परिषद महिला बालकल्याण सभापती सौ. अनुराधा नारकर यांनी केले.

नियोजित तळेरे तालुका निर्मिती कृती समितीच्या वतीने कासार्डे येथील स्मित लाँन्स येथे शनिवारी आयोजित केलेल्या महामेळाव्यामध्ये त्या बोलत होत्या. या मेळाव्याचे उद्घाटन सौ.अनुराधा नारकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने आणि कणकवली सभापती सौ.हर्षदा वाळके यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर कणकवली सभापती सौ.हर्षदा वाळके, जि.प.सदस्य सौ.प्राची इस्वलकर, पंचायत समिती सदस्य राजेश जाधव, सहदेव खाडये, समृद्धी चव्हाण, सादिक डोंगरकर, विष्णू घाडी माजी बांधकाम सभापती रविंद्र जठार, संजय देसाई, सुधीर नकाशे, माजी पं.स.सभापती संतोष कानडे, प्रकाश पारकर, बंड्या मांजरेकर, माजी सभापती दिलीप तळेकर, देवगड मंडल अध्यक्ष बंड्या नारकर, डॉ. मिलिंद कुलकर्णी, नियोजित तळेरे तालुका निर्मिती कृती समिती अध्यक्ष राजू जठार, मुंबई समिती अध्यक्ष सुर्यकांत तळेकर, तळेरे सरपंच हनुमंत तळेकर, ॲड. प्रसाद करंदीकर, अशोक तळेकर यांच्यासह कणकवली, देवगड, वैभववाडी तालुक्यातील आजी माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध संघटना पदाधिकारी, ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

हात उंचावून तालुका मागणीला समर्थन
यावेळी उपस्थित सर्व ग्रामस्थांनी हात उंचावून आणि “तळेरे तालुका झालाच पाहिजे” अशा घोषणा देत नियोजित तळेरे तालुका निर्मितीच्या मागणीला समर्थन दर्शविले. तसेच, महामेळाव्यात तळेरे तालुका झालाच पाहिजे यासाठी ठराव घेण्यात आला, त्यालाही सर्वांनी एकमुखाने समर्थन दिले.

तळेरे तालुका निर्मितीमधील महत्त्वाचे टप्पे / निकष
यावेळी मार्गदर्शन करताना नवीन तालुका निर्मितीमधील महत्त्वाचे टप्पे विषद करताना डॉ. मिलिंद कुलकर्णी म्हणाले की, सर्वात प्रथम तालुक्याला जायला 40 किमीपेक्षा जास्त अंतर लागू नये. आपल्या कार्यक्षेत्रात येणारी गावे त्याहीपेक्षा खूप कमी अंतरावर आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे त्यासाठी ११ इमारती लागतात, त्यासाठी तळेरे येथे दातृत्व आहे. तिसरी गोष्ट म्हणजे लोकसंख्या आणि आजुबाजूच्या गावांचा सहभाग. असे सर्व निकष पूर्ण करत असून पालकमंत्री नितेश राणे यांना विनंती करणार आहे की, तळेरे तालुक्याचे निर्माते तुम्ही व्हा. हे महत्त्वाचे मुद्दे त्यांनी मांडले.

यावेळी कणकवली पंचायत समिती सभापती सौ. हर्षदा वाळके म्हणाल्या की, एखाद्या भागाचा जर झपाट्याने विकास व्हायचा असेल तर नवीन तालुक्याची निर्मिती झाली पाहिजे. तरच त्या तालुक्यातील गावांचा लवकर सर्वांगीण विकास होईल. देवगड तालुक्यातील तळेरे लगतच्या गावातील लोकांना किंवा अगदी शासकीय कर्मचाऱ्यांना तालुक्याला जायचे म्हणजे पाहिले तळेरे नंतर नांदगाव आणि त्यानंतर देवगड असा प्रवास करावा लागतो. त्यामुळे तळेरे तालुका हा सर्वांनाच सोयीचा, सुलभ आणि मध्यवर्ती ठिकाण होणार आहे. जनतेच्या सोयीसाठी तळेरे तालुका होणे आवश्यकच आहे असं ठाम मत मांडले.

जंबो कार्यकारिणी होणार :-
पुढील निर्णयाच्या दृष्टिकोनातून नियोजित तळेरे तालुका कृती समितीची प्रत्येक गावातून प्रतिनिधी घेऊन जंबो कार्यकारिणी लवकरच तयार करण्यात येणार असून त्याअंतर्गत यापुढील सर्व कामकाज सुरू राहील.

यावेळी प्रकाश पारकर, सादिक डोंगरकर, रवींद्र जठार, प्राची इस्वलकर, संतोष कानडे, ॲड. प्रसाद करंदीकर, अशोक तळेकर, सुभाष उरणकर, डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. मेळाव्याच्या प्रारंभी महाराष्ट्र गीत आणि शेवट संपूर्ण वंदे मातरम् ने करण्यात आली. या मेळाव्याला नियोजित तळेरे तालुक्यामध्ये येणाऱ्या गावांमधून हजारो ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्याचे सूत्रसंचालन राजेश जाधव, प्रास्ताविक राजू जठार आणि शेवटी आभार दिलीप तळेकर यांनी मानले.

शेअर करा