घटस्थापनेदिवशी वेंगुर्ल्यात होणार पुरस्काराचे वितरण
वेंगुर्ला,दि.०६ ऑक्टोंबर(प्रथमेश गुरव) –
गेली १०४ वर्षे वेंगुर्ला येथून प्रसिद्ध होणाऱ्या साप्ताहिक किरातचा वारसा पुढे सुरू ठेवणाऱ्या शशांक आणि सीमा मराठे यांना शारदीय प्रतिष्ठानचा यावर्षीचा “शारदीय प्रतिष्ठान पुरस्कार” जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण ११ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वा. वेंगुर्ला येथील साई डिलक्स हॉल येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. दरम्यान, याच कार्यक्रमात “किरात” मुद्रणालयाचे व्यवस्थापक मेघश्याम उर्फ सुनिल मराठे यांचाही विशेष सन्मान होणार आहे.

खारेपाटण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे माजी प्राचार्य शरद विनायक काळे यांनी कथाकार, ललित लेखक, कवी व समीक्षक म्हणून साहित्य क्षेत्रात दर्जेदार कामगिरी केली आहे. तसेच त्यांच्या पत्नी वर्षा काळे यांनी खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या “नवयुवती वसतिगृहा”च्या सेवाभावी संचालक म्हणून बहुमोलाची स्त्री शिक्षण सेवा दिली आहे. या दाम्पत्याने आपल्या संसाराची ५६ वर्षे अखंडपणे एक व्रतस्थ शैक्षणिक, सामाजिक कार्य खारेपाटणमध्ये उभे केले. जगभरातील विविध क्षेत्रात आज त्यांचे विद्यार्थी कार्यरत आहेत. त्यांच्या या दाम्पत्य कार्याचा “प्रेरक जागर” म्हणून शारदीय प्रतिष्ठानच्यावतीने दरवर्षी एका सेवाभावी व साहित्य, शिक्षण आणि कलाप्रिय दाम्पत्याला “शारदीय प्रतिष्ठान पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात येत आहे. त्यांचा हा उपक्रम गेली २ वर्षे सुरू आहे. दरम्यान, यावर्षी वेंगुर्ला येथील शशांक आणि सीमा मराठे हे या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. सध्याच्या सोशल मिडियाच्या जमान्यातही विविध आव्हाने पेलत शतकोत्तर “किरात साप्ताहिक” या वृत्तपत्राचा वारसा समर्थपणे सुरू ठेवला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना “शारदीय प्रतिष्ठान पुरस्कार” जाहीर केला आहे. तसेच मुद्रणालयाच्या स्पर्धात्मक युगातही नवनवीन तंत्रज्ञान वेंगुर्ल्यासारख्या शहरी भागात आणून किरात मुद्रणालयाची धुरा संभाळणारे मेघश्याम उर्फ सुनिल मराठे यांचाही विशेष सन्मान केला जाणार आहे.
या पुरस्कार वितरणप्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक रघुवीर उर्फ भाई मंत्री हे प्रमुख अतिथी म्हणून तर ज्येष्ठ कथाकार तसेच देवगड बी.एड.कॉलेजचे माजी प्राध्यापक प्रा.श्रीराम काळे आणि शारदीय प्रतिष्ठान, खारेपाटणच्या अध्यक्ष वर्षा काळे यांची सन्मानीय उपस्थिती लाभणार आहे. तरी या पुरस्कार वितरण सोहळ्याला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन शारदीय प्रतिष्ठानतर्फे चारूता काळे-प्रभूदेसाई, डॉ.अनुजा काळे-जोशी आणि कपिल काळे यांनी केले आहे.