गाळ काढण्याच्या कामाला प्रथम पसंती; बंदर १०० टक्के क्षमतेने कार्यान्वित करण्याचा ना. नितेश राणे यांचा निर्धार
देवगड,दि.२१ ऑगस्ट
देवगड तालुक्यातील आनंदवाडी येथे देवगड बंदराची पाहणी करत पालकमंत्री तथा मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री ना. नितेश राणे यांनी मच्छीमारांशी संवाद साधून त्यांच्या समस्या आणि सूचना जाणून घेतल्या. देवगड बंदराच्या विकासासाठी उपलब्ध झालेल्या ८५ कोटी रुपयांच्या निधीचा योग्य, पारदर्शक आणि नियोजनबद्ध पद्धतीने वापर केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

देवगड बंदर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करून मच्छीमारांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला चालना देणे, हा निधी खर्च करण्यामागील मुख्य उद्देश असल्याचे ना. राणे यांनी स्पष्ट केले.
देवगड बंदरासाठी यापूर्वीही ८५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता. मात्र, त्या निधीतून अपेक्षित स्वरूपाचा विकास झालेला नसल्याची माहिती मंत्रालयातील बैठकीदरम्यान अधिकाऱ्यांकडून मिळाल्याचे ना. राणे यांनी सांगितले. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा ८५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून हा जनतेचा पैसा आहे. त्यामुळे त्याचा योग्य आणि पारदर्शक वापर होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

देवगड बंदर विकासासाठी सुमारे २२ कामे प्रस्तावित आहेत. मात्र, ही सर्व कामे एकाच वेळी न करता मच्छीमारांच्या प्रत्यक्ष गरजा लक्षात घेऊन कोणत्या कामांना प्रथम प्राधान्य द्यायचे, हे मच्छीमार आणि त्यांच्या प्रतिनिधींनी ठरवावे, अशी भूमिका ना. राणे यांनी मांडली.
गाळ काढण्याच्या कामाला प्रथम प्राधान्य
बैठकीदरम्यान मच्छीमारांनी देवगड बंदरातील गाळ काढण्याच्या कामाला सर्वप्रथम प्राधान्य देण्याची मागणी केली. बंदराच्या शेवटच्या टोकापर्यंत बोटी सुरक्षितपणे पोहोचण्यासाठी आवश्यक त्या प्रमाणात गाळ काढणे गरजेचे असल्याचे मच्छीमार प्रतिनिधींनी सांगितले. त्यानंतर जेटीची उर्वरित कामे पूर्ण करण्याची मागणीही करण्यात आली.
मच्छीमार जगन्नाथ कोयंडे यांनी पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर बोटी आणि मासळी उतरविताना निर्माण होणाऱ्या अडचणी मांडल्या. मासळी उतरविणे तसेच विक्रीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली.
संजय बांदेकर यांनी आनंदवाडीच्या बाजूने छोट्या बोटींसाठी लँडिंगची सुविधा उभारण्याची सूचना केली. तसेच बंदराच्या संरक्षण भिंतीचे काम पूर्ण करून आवश्यक ठिकाणी तिची उंची वाढविण्याची मागणी केली. छोट्या मच्छीमार बोटी सुरक्षितपणे बंदरात ये-जा करू शकतील, अशा पद्धतीने विकासकामांचे नियोजन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
तीन पंपांसह कोल्ड स्टोरेजची मागणी
मच्छीमारांनी बंदर परिसरातील मच्छीमारी संस्थांसाठी तीन पंप उपलब्ध करून देण्याची मागणी केली. तसेच मासळी साठवणुकीसाठी कोल्ड स्टोरेजची सुविधा उभारण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
मच्छीमारांच्या प्रत्यक्ष गरजा आणि त्यांच्या सूचनांच्या आधारे विकासकामांना प्राधान्य देऊन देवगड बंदर अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे ना. नितेश राणे यांनी स्पष्ट केले.