आचरा : कोकणच्या निसर्गसौंदर्यात शूटिंगसाठी रीघ लागेल; एक स्टुडिओ झाल्यास कॅलिफोर्नियाला जाण्याची गरज नाही – दिग्दर्शक राजू सावंत

शेअर करा

आचरा ,दि.३१ ऑगस्ट (अर्जुन बापर्डेकर)

कोकणातील निसर्गसौंदर्य सिनेसृष्टी आणि टीव्ही मालिकांना कायमच भुरळ घालत आले आहे. या भागात चित्रीकरण झालेले अनेक चित्रपट हिटही झाले आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निसर्गसौंदर्याचे वेड सिनेसृष्टीला लागले आहे. येथे जनरेटर, लाईट सुविधा उपलब्ध होत आहेत. मात्र, येथे एक स्टुडिओ झाल्यास शूटिंगसाठी रीघ लागेल. एवढे सुंदर सौंदर्य शूट करण्यासाठी कॅलिफोर्नियाला जाण्यापेक्षा लोक कोकणातच येतील, असे मत आघाडीचे दिग्दर्शक राजू सावंत यांनी आचरा येथे व्यक्त केले.

सध्या झी मराठीवर गाजत असलेल्या ‘सनई चौघडे’ मालिकेच्या गणेशोत्सवातील काही भागांचे शूटिंग असरोडी, आचरा या भागात करण्यात येत आहे. यासाठी आचरा येथे ग्रामपंचायत सदस्या पुर्वा तारी परेश तारी यांच्या श्रीरीसार्ट येथे चित्रीकरणासाठी आलेल्या ‘सनई चौघडे’चे दिग्दर्शक राजू सावंत यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी ही माहिती दिली.

सावंत म्हणाले, या भागात चित्रीकरणासाठी येणे ही नेहमीच माझी पसंती असते.गाव गाता गजाली,रात्रीस खेळ चाले या मालिकांच्या माध्यमातून येथील कलाकारांशी आपले ऋणानुबंध जुळले आहेत. ‘सनई चौघडे’ या मालिकेतील परब कुटुंब हे कोकणातील असून या वर्षी चतुर्थीची त्यांची वर्षाल (वर्सल) असल्याने ते गावी आले आहेत.

या निमित्ताने कोकणातील गणेशोत्सव किती उत्साहाने साजरा केला जातो हे संपूर्ण महाराष्ट्राला समजणार आहे. गणपती-गौरी आणण्यापासून ते विसर्जनापर्यंतचे सर्व विधी या मालिकेत दाखवले आहेत. गणेश चतुर्थीमध्ये १६ तारखेपासून हे एपिसोड दाखविले जाणार असल्याचेही सावंत यांनी सांगितले. असरोंडी नंतर आचरा येथील समुद्र किनारी रविवारी या मालिकेतील काही भागाचे चित्रीकरण करण्यात आले.यात सनई चौघडे मालिकेतील प्रमुख पात्रे जय खानोलकर, शर्वरी परब, आसावरी,साक्षी खानोलकर,रेवा,मॅक, गौतम खानोलकर आकाश आदी सहभागी झाले होते.

शेअर करा