मोटारसायकल चोरीचा तपास उलगडला; भंगार विक्रेता ताब्यात, पुढील तपास सुरू.
बांदा, दि. १८ जून
बांदा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांना महत्त्वाचे यश मिळाले आहे. चोरीस गेलेली मोटारसायकल भंगार विक्रेत्याच्या टेम्पोमध्ये सुट्या भागांच्या स्वरूपात आढळून आली असून याप्रकरणी भंगार विक्रेत्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बांदा पोलीस ठाण्यात मोटारसायकल चोरीप्रकरणी गुन्हा दाखल असून तपासादरम्यान पोलिसांना चोरीस गेलेल्या मोटारसायकलबाबत माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी भंगार विक्रेता रज्जाक खान याच्या टेम्पोची तपासणी केली असता संबंधित मोटारसायकल खोललेल्या अवस्थेत आढळून आली.
याबाबत चौकशी केली असता, एका अल्पवयीन मुलाने ही मोटारसायकल आधीच खोललेल्या स्थितीत आपल्याकडे आणून दिल्याचे रज्जाक खान याने पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी चोरीची मोटारसायकल जप्त केली असून पुढील चौकशीसाठी रज्जाक खान याला ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, या प्रकरणातील अल्पवयीन मुलाकडेही पोलीस सखोल तपास करत असून मोटारसायकल चोरीच्या घटनेमागील नेमके धागेदोरे शोधण्याचे काम सुरू आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस हवालदार धरणे करीत आहेत.