Malvan News : बॅरिस्टर नाथ पै सेवांगणातील उखाणे स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

शेअर करा

पारंपरिक लोककलेतून भाषेचे सौंदर्य, विनोद आणि सर्जनशील अभिव्यक्तीला मिळाले व्यासपीठ

मालवण,दि.२८ ऑक्टोंबर

उखाणा म्हणजे केवळ पतीचे किंवा कुटुंबातील व्यक्तीचे नाव घेण्याची पारंपरिक पद्धत नव्हे, तर भाषेचे सौंदर्य, शब्दांची गुंफण, यमक, विनोदबुद्धी आणि सामाजिक जाणिवा व्यक्त करणारे लोकसाहित्याचे प्रभावी माध्यम आहे. काळानुसार बदलत गेलेल्या या लोकपरंपरेला नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासोबतच महिलांच्या सर्जनशील अभिव्यक्तीला व्यासपीठ देण्याच्या उद्देशाने बॅरिस्टर नाथ पै सेवांगण येथे आयोजित उखाणे स्पर्धेला महिलांचा अभूतपूर्व आणि उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

मराठी भाषा विभाग आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या अनुदानातून, बॅरिस्टर नाथ पै सेवांगण यांच्या आयोजनाखाली आगामी २८ व २९ नोव्हेंबर २०२६ रोजी होणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा युवा साहित्य संमेलनाच्या पूर्वतयारीचा एक भाग म्हणून सेवांगणच्या दादासाहेब शिखरे सभागृहात हा कार्यक्रम झाला.

प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला मीना केळकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विलिंदी नेरुरकर, दिव्या पाटकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धेचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे उखाण्यांच्या विषयांमध्ये दिसून आलेली विविधता होय

स्पर्धकांनी किल्ले सिंधुदुर्गाचा ऐतिहासिक वारसा, मालवणी संस्कृती, स्त्री सक्षमीकरण, शिक्षण, पर्यावरण, दुष्काळ, सामाजिक प्रश्न, कुटुंबव्यवस्था आणि बदलत्या काळातील स्त्रियांचे स्थान यांसारख्या गंभीर व समकालीन विषयांवर खुसखुशीत व प्रभावी उखाणे सादर केले. काही उखाण्यांतून विनोदाची खुमारी अनुभवायला मिळाली, तर काहींमधून सामाजिक प्रश्नांवर परखड भाष्य आणि वैचारिक संदेश व्यक्त झाला. ज्ञानेश्वरी आणि संत एकनाथांच्या अभंगांमध्येही उखाण्यांचे संदर्भ असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

या स्पर्धेत आठ वर्षांच्या चिमुकल्या मुलींपासून ते ऐंशी वर्षांच्या ज्येष्ठ आजींपर्यंतच्या सुमारे ५४ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून साने गुरुजी वाचन मंदिराच्या कार्याध्यक्ष डॉ. ज्योती बुवा तोरसकर आणि सेवांगणच्या कार्यकारिणी सदस्य तथा स्पर्धा संयोजक डॉ. सुमेधा नाईक यांनी काम पाहिले . यावेळी सुपला झांटये, वंदना कांदळकर, ऋतुजा केळकर आणि नंदिनी सुतार यांनी हादग्याची गीते गात उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साने गुरुजी वाचन मंदिराच्या ग्रंथपाल ऋतुजा केळकर यांनी केले, तर आभार डॉ. ज्योती बुवा तोरसकर यांनी मानले. यावेळी रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्पर्धेतील सर्व विजेत्यांना येत्या २८ व २९ नोव्हेंबर २०२६ रोजी होणाऱ्या मुख्य साहित्य संमेलनात मान्यवर साहित्यिकांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.

शेअर करा