Kankavli news:कणकवली तालुक्यात ‘गाव तिथे शाखा’ अभियान राबविणार – राजू राठोड

शेअर करा

लोकसभा संपर्कप्रमुख प्रदीप बोरकर यांच्या उपस्थितीत विभागप्रमुखांची बैठक; संघटनात्मक बांधणीवर सविस्तर चर्चा

कणकवली,दि.२७ऑक्टोंबर

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या कणकवली तालुक्यातील संघटनात्मक बांधणीला अधिक बळकटी देण्यासाठी ‘गाव तिथे शाखा’ अभियान राबविण्यात येणार आहे. तालुक्यातील प्रत्येक गावात पक्षाची शाखा स्थापन करून संघटनेचा विस्तार करण्यावर भर देण्यात येणार असल्याची माहिती तालुकाप्रमुख राजू राठोड यांनी दिली.

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे लोकसभा संपर्कप्रमुख प्रदीप बोरकर यांच्या उपस्थितीत कणकवली तालुक्यातील सर्व विभागप्रमुखांची बैठक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीत संघटनात्मक बांधणी, पक्षाचा विस्तार, गावागावांत शाखा स्थापन करणे, कार्यकर्त्यांचे संघटन आणि आगामी काळातील पक्षाच्या कामाचे नियोजन अशा विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीदरम्यान तालुक्यातील विविध विभागप्रमुखांनी आपापल्या विभागातील संघटनात्मक परिस्थितीचा आढावा मांडला. स्थानिक पातळीवर संघटनेचे काम करताना येणाऱ्या समस्या, अडचणी तसेच कार्यकर्त्यांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांची माहिती लोकसभा संपर्कप्रमुख प्रदीप बोरकर यांच्यासमोर मांडण्यात आली.

गावागावांत शाखा स्थापन करण्यावर भर

कणकवली तालुक्यातील संघटना अधिक मजबूत करण्यासाठी तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. याच उद्देशाने ‘गाव तिथे शाखा’ हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक गावात पक्षाची शाखा स्थापन करून स्थानिक पातळीवर संघटनात्मक कामाला गती देण्यात येणार आहे.

या बैठकीला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे कणकवली तालुकाप्रमुख राजू राठोड, कलमठ विभागप्रमुख विलास गुडेकर, कळसुली विभागप्रमुख बबली राणे, फोंडा विभागातील सिद्धेश राणे, बाळा राऊत, तात्या निकम, गुरू पेडणेकर, रवींद्र खांदारे, ओमप्रकाश ताम्हणेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

शेअर करा