Sindhudurg news : सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाला राष्ट्रीय सन्मान; केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

शेअर करा

व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे, सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी स्वीकारला पुरस्कार

सिंधुदुर्ग,दि.२७ऑक्टोंबर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी पर्यटनाला नवी ओळख देणाऱ्या ‘EX-INS गुलदार अंडरवॉटर म्युझियम, आर्टिफिशियल रीफ अँड सबमरीन टुरिझम प्रोजेक्ट’ला प्रतिष्ठित ‘गोल्डन बनियन अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला. नवी दिल्ली येथे झालेल्या ‘द वीक हेरिटेज अवॉर्ड्स २०२६’ सोहळ्यात केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे, सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि एमटीडीसीचे प्रादेशिक अधिकारी दिलीप माने यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या प्रकल्पाला ‘बेस्ट इनोव्हेशन/प्रॉडक्ट’ आणि ‘बेस्ट क्रिएटिव्ह/कॅम्पेन’ या दोन श्रेणींमध्ये सन्मानित करण्यात आले.

भारतीय नौदलात ३८ वर्षे सेवा बजावलेली निवृत्त ‘आयएनएस गुलदार’ युद्धनौका सिंधुदुर्गातील निवती रॉक्स परिसरात पाण्याखालील संग्रहालय आणि कृत्रिम प्रवाळभित्ती म्हणून विकसित करण्यात येत आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि भारतीय नौदल यांच्या संयुक्त विद्यमाने, केंद्र शासनाच्या पर्यटन मंत्रालयाच्या सहकार्याने सुमारे ४६.९१ कोटी रुपयांचा हा प्रकल्प साकारण्यात येत आहे. यामुळे स्कूबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग आणि साहसी सागरी पर्यटनाला चालना मिळणार आहे.

या प्रकल्पामुळे सागरी जैवविविधतेच्या संवर्धनासोबतच स्थानिक रोजगारनिर्मितीच्या नव्या संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. महाराष्ट्र शासनाच्या प्रगती अहवालानुसार, प्रकल्प ३१ मार्च २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असून, प्रकल्प पूर्ण झाल्यानंतरच्या दहा वर्षांत सुमारे ८०० प्रत्यक्ष रोजगार निर्माण होण्याचा अंदाज आहे. या राष्ट्रीय सन्मानामुळे सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाच्या विकासाला आणि कोकणच्या पर्यटन ओळखीला नवी उंची मिळाली आहे.

शेअर करा