Banda News:पत्रादेवी अबकारी चेकपोस्टवर एसीबीचा छापा; २,५०० रुपये जप्त

शेअर करा

वाहनांकडून कथित वसुलीच्या आरोपांनंतर कारवाई; गोव्यातील मोले चेकपोस्टवरही छापा, दोन्ही ठिकाणांहून १३ हजार ७० रुपये जप्त

बांदा,दि.२७ऑक्टोंबर
गोवा-महाराष्ट्र सीमेवरील पत्रादेवी अबकारी चेकपोस्टवर वाहनांकडून कथित पैसे वसुली आणि तपासणीतील अनियमिततेच्या आरोपांनंतर आता भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अचानक छापा टाकून कारवाई केली आहे. दक्षता जागरूकता सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या या कारवाईत पत्रादेवी चेकपोस्टवरून २ हजार ५०० रुपये, तर गोव्यातील मोले अबकारी चेकपोस्टवरून १० हजार ५७० रुपये अशी एकूण १३ हजार ७० रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. या कारवाईमुळे सीमावर्ती अबकारी तपासणी नाक्यांवरील कार्यपद्धती पुन्हा चर्चेत आली आहे.

देशभरात २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ‘दक्षता जागरूकता सप्ताह २०२६’ साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर गोव्यातील अबकारी खात्याच्या चेक पोस्टवर एसीबीने अचानक तपासणी केली. एसीबीचे अधीक्षक राजन निगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. मोले येथील अबकारी चेक पोस्टवर निरीक्षक सतीश गावडे यांनी, तर पत्रादेवी येथील चेक पोस्टवर निरीक्षक प्रज्योत फडते यांनी आपल्या पथकासह ही तपासणी केली.

या तपासणीदरम्यान मोले चेक पोस्टवर १० हजार ५७० रुपये, तर पत्रादेवी चेक पोस्टवर २ हजार ५०० रुपये रोख रक्कम आढळून आली. दोन्ही ठिकाणांहून एकूण १३ हजार ७० रुपये जप्त करण्यात आले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या संबंधित कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून एसीबीकडून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, पत्रादेवी चेकपोस्टवर वाहनांच्या तपासणीदरम्यान कथित पैसे वसुली होत असल्याचे आरोप यापूर्वीही करण्यात आले होते. वाहनांकडून २० ते ५० रुपये घेतले जात असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी आंदोलन केल्याचे वृत्त समोर आले होते. चेकपोस्टवरील सीसीटीव्ही कॅमेरे योग्य प्रकारे कार्यरत नसल्याने तपासणी प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.

तसेच मालवाहू वाहनांची पुरेशी तपासणी होत नसल्याचा, काही वाहनांमधून दारूची अवैध वाहतूक होत असल्याचा आणि बनावट कागदपत्रांचा वापर केला जात असल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला होता. या आरोपांवरून चेकपोस्टवरील तपासणी यंत्रणेच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्न उपस्थित झाले होते.

आता दक्षता जागरूकता सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर एसीबीने केलेल्या अचानक कारवाईमुळे पत्रादेवी चेकपोस्टवरील तपासणी यंत्रणा आणि संबंधित कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीकडे पुन्हा लक्ष वेधले गेले आहे. मात्र, पूर्वीचे आरोप आणि सध्याच्या एसीबी कारवाईचा परस्पर संबंध असल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सीमावर्ती चेकपोस्टवरून मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा होत असल्याने वाहन तपासणी पारदर्शक आणि नियमांनुसार होणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर एसीबीच्या कारवाईतून पुढे काय निष्पन्न होते आणि संबंधित चौकशीत कोणती माहिती समोर येते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

शेअर करा