Malvan News:मालवणच्या रॉक गार्डनमधील खेळण्यांची दुरवस्था; मनसेचा आंदोलनाचा इशारा

शेअर करा

प्रवेश शुल्क आकारूनही पर्यटकांना सुविधा नाहीत; खेळण्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मनसेचे तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांची मागणी

मालवण,दि.२८ ऑक्टोंबर

मालवण नगरपालिकेच्या रॉक गार्डनमधील लहान मुलांच्या खेळण्यांची दुरवस्था झाली असून, पर्यटकांकडून प्रवेश शुल्क आकारूनही आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र नाराजी व्यक्त केली असून खेळण्यांची तातडीने दुरुस्ती न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेचे मालवण तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांनी दिला आहे.

मालवण शहरातील रॉक गार्डन हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. मात्र, येथील घसरगुंड्या, झोपाळे आणि अन्य खेळण्यांची अवस्था दयनीय झाली आहे. मोडकळीस आलेल्या खेळण्यांमुळे लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, एखादी दुर्घटना घडल्यानंतरच नगरपालिका प्रशासनाला जाग येणार का, असा सवालही गॅरी अन्ननसिएशन यांनी उपस्थित केला

रॉक गार्डनमध्ये प्रवेशासाठी पर्यटकांकडून शुल्क आकारले जाते; मात्र त्या तुलनेत सुरक्षित आणि सुस्थितीतील सुविधा देण्यात नगरपालिका अपयशी ठरत असल्याची टीका मनसेने केली आहे. गेल्या वर्षभरापासून खेळण्यांची दुरवस्था कायम असतानाही प्रशासनाकडून उपाययोजना का करण्यात आल्या नाहीत? मालवणचे पर्यटन विकसित करायचे आहे की निष्काळजी कारभारामुळे पर्यटनस्थळाची अवस्था बिकट करून पर्यटकांना दूर लोटायचे आहे, असा सवालही अन्ननसिएशन यांनी केला आहे

याबाबत मनसेने निवेदनात ज्या प्रमुख मागण्या केल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने रॉक गार्डनमधील सर्व खेळण्यांची तातडीने तपासणी करावी, धोकादायक खेळणी दुरुस्ती होईपर्यंत बंद ठेवावीत आणि आवश्यक दुरुस्ती व देखभाल त्वरित पूर्ण करावी. तसेच प्रवेश शुल्काच्या बदल्यात पर्यटकांना सुरक्षित सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. खेळण्यांच्या दुरावस्थेला जबाबदार असलेल्या संबंधित अधिकारी व ठेकेदारांची चौकशी करून कारवाई करावी. दुरुस्ती पूर्ण करण्याची निश्चित मुदत जाहीर करून त्याबाबतचा लेखी अहवाल द्यावा, अशा मागण्या केल्या आहेत.

नगरपालिका प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कार्यवाही करावी; अन्यथा मनसेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा गॅरी अन्ननसिएशन यांनी दिला आहे.

शेअर करा