Sawantwadi News : शिवसेनेतच अंतर्गत शीतयुद्ध; भाजपवर टीका म्हणजे राजकीय स्टंटबाजी

शेअर करा

भाजप प्रवक्ते अँड. सिद्धार्थ भांबुरे यांचा संजू परब यांच्या आरोपांवर पलटवार

​सावंतवाडी,दि.२८ ऑक्टोंबर
सावंतवाडी नगरपरिषदेच्या नळपाणी योजनेवरून राजकीय वातावरण तापले असून, भारतीय जनता पार्टीमध्ये कोणतेही शीतयुद्ध नसून शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्येच एकमत नसल्याचे उघड झाले आहे. माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी भाजपवर केलेले आरोप हे निव्वळ राजकीय स्टंटबाजी आणि जनतेची दिशाभूल करणारे आहेत, असा जोरदार पलटवार भाजपचे प्रवक्ते नगरसेवक अँड. सिद्धार्थ भांबुरे यांनी केला.
​येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी भाजप शहराध्यक्ष तथा सभापती सुधीर आरीवडेकर, महिला बालकल्याण सभापती सौ. दिपाली भालेकर, नगरसेवक सुकन्या टोपले, भाजप सरचिटणीस दिलीप भालेकर, संतोष तळवणेकर आदी उपस्थित होते.
​अँड. भांबुरे म्हणाले की, उपनगराध्यक्ष अँड. अनिल निरवडेकर यांनी नळपाणी योजनेतील तांत्रिक मुद्द्यांवर पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली होती. तर शिवसेना शहरप्रमुख नगरसेवक खेमराज कुडतरकर आणि शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदांचे अवलोकन केले असता, शिवसेनेतच अंतर्गत शीतयुद्ध सुरू असल्याचे दिसून येते. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये एकमत किंवा तारतम्य उरलेले नाही. स्वतःमधील मतभेद लपवण्यासाठी संजू परब यांनी भाजप नगरसेवकांमध्ये शीतयुद्ध असल्याचा चुकीचा आरोप केला आहे.
​नगराध्यक्षा सौ. श्रद्धा सावंत-भोसले शांत नसून त्यांचे काम सुरू आहे, असे सांगताना ते पुढे म्हणाले की, थर्ड पार्टी ऑडिटबाबत विशेष बैठकीत तांत्रिक आक्षेप घेण्यात आला होता. त्यावेळी ऑडिट करणारे प्रतिनिधी उपस्थित नसल्याने त्यांनी उपस्थित राहून शंकांचे निरसन करावे, एवढीच रास्त मागणी उपनगराध्यक्षांनी केली होती. भाजपच्या कोणत्याही नगरसेवकाला नळपाणी योजनेचे काम थांबवण्यात रस नाही. लोकांना वेळेवर पाणी मिळालेच पाहिजे, मात्र योजनेतील त्रुटी दूर करून ती पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने राबवली जावी, हीच भाजपची भूमिका आहे.
​भाजपचा वाढता जनाधार पाहून विरोधकांच्या पोटात दुखू लागले असून, म्हणूनच लोकांचा बुद्धीभेद केला जात आहे. नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष आणि भाजपचे सर्व नगरसेवक शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शेवटच्या घटकांपर्यंत योजना पोहोचवण्यासाठी कटिबद्ध आहेत. त्यामुळे विरोधकांनी दिशाभूल न करता जनतेच्या कल्याणासाठी एकत्र येऊन काम करावे, अशी अपेक्षाही अँड. भांबुरे यांनी व्यक्त केली.

शेअर करा