जिल्ह्यात एक हजार दुधाळ जनावरे आणण्याचे उद्दिष्ट; शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम
सिंधुदुर्ग,दि.२८ ऑक्टोंबर
सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुग्धव्यवसायाचा विस्तार करण्यासाठी दुग्ध संस्थांनी सक्रिय सहभाग घ्यावा. आपल्या कार्यक्षेत्रातील पात्र व इच्छुक शेतकऱ्यांची निवड करून त्यांना दुधाळ जनावरे खरेदीसाठी प्रोत्साहित करावे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सर्वोतोपरी मदत करेल, असे प्रतिपादन बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले.
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या भाईसाहेब सावंत सभागृहात दुधाळ जनावरे खरेदी योजनेसंदर्भात आयोजित दुग्ध संस्थांच्या प्रतिनिधींच्या मार्गदर्शन सभेत ते बोलत होते. यावेळी बँकेचे संचालक दिलीप रावराणे, भगिरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रसाद देवधर, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई यांच्यासह विविध दुग्ध संस्थांचे प्रतिनिधी आणि दुग्धव्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मनीष दळवी म्हणाले, गेल्या वर्षी आंबा आणि काजू पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी दुग्धव्यवसायासारखा शेतीपूरक व्यवसाय उभा करणे आवश्यक आहे. प्रत्येक दुग्धव्यावसायिकाने आपल्या गावातील आणखी पाच शेतकऱ्यांना या व्यवसायाशी जोडून एक गट तयार करावा. अशा प्रकारे प्रत्येक गावात दुग्धव्यवसायाचे गट निर्माण झाल्यास जिल्ह्यात एक हजार दुधाळ जनावरे आणण्याचे उद्दिष्ट साध्य करता येईल. यासाठी आवश्यक आर्थिक पाठबळ जिल्हा बँक देईल.
पात्र लाभार्थी निवडीत दुग्ध संस्थांची भूमिका महत्त्वाची
दुधाळ जनावरे खरेदी योजनेसाठी लाभार्थी निवडताना दुग्ध संस्थांनी विशेष काळजी घ्यावी. शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून लाभार्थी निवडता आले असते. मात्र, निवडलेले शेतकरी प्रत्यक्ष दुग्धव्यवसायाशी जोडलेले असतीलच, याची खात्री देता येत नाही. त्यामुळे दुग्धव्यवसायाचा अनुभव आणि आवड असलेल्या तसेच आपल्या संस्थांशी संबंधित पात्र शेतकऱ्यांची निवड करणे गरजेचे आहे,असे मत मनिष दळवी यांनी सांगितले.
यंदा तीव्र पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेता दुधाळ जनावरांची योग्य निगा राखू शकणाऱ्या आणि त्यांच्यासाठी आवश्यक व्यवस्था करू शकणाऱ्या शेतकऱ्यांना प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे. लाभार्थ्यांची योग्य निवड करण्यासाठी दुग्ध संस्थांच्या प्रतिनिधींनी आपल्या अनुभवाचा उपयोग करावा, असे आवाहनही दळवी यांनी केले.
चारा उपलब्धतेसाठी विशेष प्रयत्न
दुधाळ जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक चारा बियाण्यांचा पुरवठा करण्यात येणार आहे. तसेच चारा लागवडीसाठी अतिरिक्त अनुदान देण्याबाबत विचार सुरू आहे. शासनाच्या सिंधुरत्न योजनेच्या माध्यमातून पालकमंत्र्यांनीही प्रत्येक दूध उत्पादकाला किमान २० हजार रुपयांचे अतिरिक्त आर्थिक सहकार्य देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे.
दूध संकलनात वाढ करणाऱ्या दुग्ध संस्थांना व्यवस्थापन खर्चासाठी आर्थिक सहाय्य देण्याबाबतही जिल्हा बँक सकारात्मक आहे. यासंदर्भातील प्रस्ताव संचालक मंडळासमोर मांडण्यात येणार असल्याची माहिती दळवी यांनी दिली.
शेतकऱ्यांना सक्षम करणे हाच बँकेचा उद्देश
“बँकेचा उद्देश नफा मिळवणे नसून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा आहे,” असे स्पष्ट करत दुग्ध संस्थांच्या सहकार्याने जिल्ह्यात दुग्धव्यवसायाची चळवळ उभी करावी. या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून द्यावे, असे आवाहन मनीष दळवी यांनी केले.