Sindhudurg News : अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी

शेअर करा

३० ऑक्टोबरला जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा

सिंधुदुर्ग,दि.२८ ऑक्टोंबर
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियमाबाबत जाणीव-जागृती निर्माण करणे आणि कायद्याची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे आणि सहायक आयुक्त, समाज कल्याण, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय एकदिवसीय अॅट्रोसिटी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन शुक्रवार, दि. ३० ऑक्टोबर २०२६ रोजी करण्यात आले आहे.
ही कार्यशाळा सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्गनगरी येथील मायनाक भंडारी सभागृहात होणार आहे. अशी माहिती सहायक आयुक्त, समाज कल्याण, संतोष चिकणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
या कार्यशाळेत महसूल व वन विभागातील उपविभागीय अधिकारी (प्रांत), गृह विभागातील उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस विभागाच्या नागरी हक्क संरक्षण शाखेतील अधिकारी-कर्मचारी, सामाजिक न्याय विभागातील संबंधित अधिकारी, विधी व न्याय विभागातील सरकारी अभियोक्ता तसेच ग्रामविकास विभागातील गटविकास अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती आणि उपविभागीय दक्षता व नियंत्रण समित्यांशी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही यात सहभाग असेल.
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियमाच्या तरतुदींची माहिती संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांना देणे, कायद्याबाबत जागरूकता वाढविणे, जातीय सलोखा दृढ करणे आणि अत्याचार प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेची कार्यक्षमता वाढविणे हा या कार्यशाळेचा प्रमुख उद्देश आहे.
संबंधित विभागांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या प्रशिक्षण कार्यशाळेस उपस्थित राहावे, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे.

शेअर करा