बांदा : ब्रेक निकामी झाल्याने कंटेनरचा अपघात; मोठी दुर्घटना टळली

शेअर करा

पोलीस तपासणी नाक्याजवळ मध्यरात्रीपूर्वी घडली घटना; कंटेनर रस्त्याच्या कडेला घसरला, जीवितहानी नाही.

बांदा,दि. २१ जून
बांदा येथील पोलीस तपासणी नाक्याजवळ काल रात्री साडेअकराच्या सुमारास ब्रेक निकामी झाल्याने एका कंटेनरचा अपघात झाला. नियंत्रण सुटल्याने कंटेनर रस्त्याच्या कडेला घसरला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झाली नाही. मात्र कंटेनरचे नुकसान झाले आहे.


ही घटना पोलीस तपासणी नाक्यापासून अवघ्या काही फूट अंतरावर घडल्याने काही काळ परिसरात धावपळ उडाली होती. अपघातावेळी रस्त्यावर वर्दळ कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले.


दरम्यान, याच ठिकाणी सुमारे वर्षभरापूर्वीही अशाच प्रकारचा अपघात घडला होता. त्यामुळे या भागातील वाहतुकीच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.


अपघातग्रस्त कंटेनर रात्री उशिरापर्यंत रस्त्यावरच असल्याने वाहतुकीवर काही प्रमाणात अडथळा निर्माण झाला होता. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने कंटेनर सुरक्षितपणे बाजूला करण्यात आला आणि वाहतूक सुरळीत करण्यात आली.
या घटनेबाबत बांदा पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार किंवा गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याची माहिती मिळाली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला.

शेअर करा